एक दाद अशी तर एक तशी… → ‘मनभावन’ ह्या माझ्या कुसुमाकर मासिकाच्या सदरातील चवथा लेख

kusumakarmasikएक दाद अशी तर एक तशी…
गझल मुशायरा किंवा हिंदी कवीसंमेलनात खूप छान माहौल असतो. कवींच्या कवितेला,शेरांना खूप मस्त ‘दाद’ अर्थात ‘प्रतिसाद’ मिळत असतो आणि कवी-कवयित्रीही अगदी मन:पूर्वक काव्यगोष्टी करण्यात रमलेले असतात तर रसिक श्रोत्यांचं काव्याचा आनंद घेवून एकीकडे ‘इर्शाद,वाह वा ,क्या बात है, सुभान अल्ला… अशी दाद वर दाद देणं चालू असतं. विविध शेरोशायरीची रेलचेल असते. अगदी जिवंत वातावरण असतं ते.. आणि हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या दोन वेगवेगळ्या कवितेला उत्स्फूर्तपणे,नोंद घेण्यासारखी मिळालेली एक दाद अशी तर एक दाद तशी…
झालं काय, वाचता वाचता मी लिहू लागले आणि कविता माझी प्रिय सखी झाली. मग कवितेमुळे एकेक मैत्र मिळत गेले  आणि साहित्याने,मैत्रीने माझं जीवन समृध्द होत गेलं. हळूहळू मला काव्य संमेलनाचे आमंत्रण मिळू लागले. मी कविता सादर करण्यास जाऊ लागले. माझ्या कविता श्रोत्यांना आवडू लागल्या.अर्थात हे मी मला वेळोवेळी मिळत गेलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दाद किंवा प्रतिक्रियेमुळे म्हणू शकते.
दाद-टाळ्या हे कवी-कवयित्रीचे टोनिक (Tonic) असतं. ‘दाद’ एक शाबासकी असते, एक प्रोत्साहन असतं. दाद ही काव्यवेलीसाठी अमृतही असतं. पण कधी श्रोत्यांची दाद ही नि:शब्दही असू असते. हे मात्र माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं.
झालं असं…एका कविसंमेलनात मी माझी नेत्रदानावरची कविता सादर केली , माझ्या कवितेत मी म्हणत होते की, ‘ देवा,मला असं मरण दे कि मला माझ्या मरणानंतर माझे डोळे दान करता आले पाहिजे….’ कविता संपली. पण लोकांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.किंवा ‘दाद’ही दिली नाही. नाही म्हणायला एक दोन टाळ्या वाजल्या, मी मनातून थोडी खट्टू झाले. आशेने सूत्रसंचालिकेकडे बघितलं तर ती सूत्रसंचालिकाही माझ्या कवितेला काय दाद द्यावी या संभ्रमात पडलेली मला भासली. कारण तिनेही माझ्या कवितेवर काही एक भाष्य न करता लगेचच दुसऱ्या कवीला बोलावलं. मी विचारात पडले. अरे मी तर कविता चांगली सादर केली पण मग सगळे एवढे गप्प का? म्हणजे माझं चुकलं तर काय चुकलं? नंतर जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा मात्र त्या सूत्रसंचालिकेने स्वत:हून खुलासा केला कि तुझी कविता चांगली आहे पण त्या कवितेला दाद देणं मला जरा कठीण झालं कारण तुझ्या  कवितेचा विषय ….
मी समजून घेतलं  कि माझ्या त्या सूत्र संचालिकेला आणि श्रोत्यांनाही माझ्या कवितेच्या विषयामुळे काही बोलणं,दाद देणं अवघड झालं असावं. मी फक्त समंजसपणे हसले. आणि मनात म्हटलं कि खरच ‘मरण’ हा विषय असा आहे कि, त्यावरील माझ्या कवितेला मिळणारी दाद एवढी निशब्द असू शकते, तर…..आता मात्र मी जेव्हा कधी ती कविता संमेलनात म्हणते तेव्हा तेव्हा त्या कवितेला कोणी टाळ्या वाजवणार नाही हे गृहीत धरते. असो.
अशीच एक वेगळी आणि अविस्मरणीय दाद माझ्या माधुरी दीक्षितला लिहिलेल्या ‘प्रेमळ गाऱ्हाणं’ या कवितेला मिळालेली आहे. त्या कवितेचा विषय हा तिरकस विनोदावर आधारित असून त्यात नवरा कसा आपल्या बायकोला सोडून माधुरीचा दिवाना झालेला आहे हे मी त्यात वर्णन केलं होतं. आणि शेवटी सगळे नवरे कसे एक सारखेच असतात अर्थात,देखणी बायको दुसऱ्याची किंवा घरोघरी मातीच्या चुली असतात असं मी कवितेत म्हटलेलं आहे. माझी ती कविता स्त्री वर्गाला विशेष करून आवडते. मी माझी कविता सादर केल्यावर , माझ्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि जे सूत्र संचालक होते ते म्हणाले कि ह्यांची माधुरी दीक्षित वरील कविता छान म्हणजे अगदी वास्तववादी आहे…आणि त्याचवेळी श्रोत्यामधून एक आवाज आला, वास्तववादी? नाही नाही,अहो विस्तववादी कविता म्हणा विस्तववादी! आता ही दाद ऐकताच सगळे श्रोते परत हसू लागले.. आणि अर्थातच मीही ती उत्स्फूर्त दाद ऐकून आणि तीही एका पुरुषाकडून मिळाली आहे हे ऐकून  हसू लागले…म्हणजे माधुरी दीक्षितला लिहिलेली ‘प्रेमळ गाऱ्हाणं’ ही कविता तर माझी मनभावन आहेच पण त्या कवितेला मिळालेली ती ‘विस्तववादी’ दादही आता माझ्यासाठी मनभावन झालेली आहे.
———————————————————————————————————-

यावर आपले मत नोंदवा