इमेज

धन्यवाद Shyam Pendhari सर … कुसुमाकर जानेवारी २०१४ च्या अंकात आलेलं मनभावन ….टपटप पडती अंगावरती…

धन्यवाद Shyam Pendhari सर ... कुसुमाकर जानेवारी २०१४ च्या अंकात आलेलं मनभावन ....टपटप पडती अंगावरती...

धन्यवाद Shyam Pendhari सर …
कुसुमाकर जानेवारी २०१४ च्या अंकात आलेलं मनभावन ….टपटप पडती अंगावरती…

Advertisements
इमेज

कुसुमाकर मासिकातील मनभावन या माझ्या सदरातील लेख – चुकीचं पुराण

‘चुकी’चं पुराण

kusumakarmasik                                                                                                                               Nobody is Perfect….अर्थात कोणीही परिपूर्ण नसत.पण मग तरीही समोरच्याने चूक केली की आपण त्याला धारेवर का धरत असतो? चूक ही नेमकी कशी घडते आणि का घडते? आणि ती गोष्ट चूक आहे की नाही हे ठरवणारे आपण कोण असतो? चुकीबाबत प्रत्येकाचा दृष्टीकोन हा निराळा असतो,वेगळा असतो. आणि ‘चूक’ म्हणजे नेमकं काय असतं ? आणि समोरचा माणूस चूक आहे हे ठरविण्याची नेमकी परिमाणे कोणती? जे आपल्याला चूकीचे वाटते ते समोरच्याला चूक वाटेल का? की हा एक आपापल्या अनुभवाचा भाग असतो? की समोरची  परिस्थिती ठरवते हे चूक आहे की नाही? एका चुकीमुळे एखाद्याला त्रास होतो तर एखाद्याला जीवन मिळते. म्हणजे चूक ही परिस्थितीसापेक्ष असते की व्यक्तीसापेक्ष?                                                    समजा एखाद्या व्यक्तीचे महत्वाचे काम आहे आणि नेमकी त्याची गाडी चुकते. ती गाडी पकडायला त्याने यातायातही केलेली नसते.तो चुकचुकतो आणि दुसऱ्या गाडीने इच्छित स्थळी पोहचतो तेव्हा त्याला कळते की ती त्या आधिच्या गाडीला अपघात झालेला आहे. म्हणजे त्याची पहिली गाडी चुकली; ही चूक तर त्याच्यासाठी चांगलीच नशीबवान ठरली नां! आता एखाद्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या माणसाला त्याच्या बरोबरचे माणसं अपघातात दगावले आहेत हे सांगणं तर एकदमच चूकीचं आहे असं मला वाटतं. कारण त्या जखमी माणसाच्या मनावर आघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काही शास्त्रीय  प्रयोग करताना वा कॉम्प्यूटरवर प्रोग्राम फिड करताना, चुकीने झालेली चूकही मात्र होत्याचं नव्हतं करून टाकते आणि तेव्हा मात्र अशा चुकीला क्षमा नसते.

कधी काय होतं की, एखादी गोष्ट एका ठराविक पद्धतीने होत असते, त्यात काही अनपेक्षित बदल घडले,करावे लागले तर मग ती चूक कोणाची? म्हणजे एखादी व्यक्ती चांगल्या भावनेने काही गोष्टी अगदी वेळेवर बदलते. आणि समोरच्या माणसाच्या रोषाचे कारण बनते …..आणि मग त्या  व्यक्तीला कळतच नाही नेमकं आपलं चुकलं तर काय चुकलं? म्हणजे खरंतर समोरच्याकडून काय चूक झाली, ती चूक तो कसा टाळू शकला असता, त्याने काय काळजी घ्यायला हवी होती हे सांगणारे मात्र कुणीच नसतात,वा सांगण्याचा प्रयत्नही करत नाहीत  आणि त्यामुळे नकळत हातून चूक झालेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास खच्ची होतो. मग अशावेळेस कोणाची चूक दाखवणं हि एक चूक होवू शकते का? कदाचित होतही असेल….कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण बरेचदा काय चूक आणि काय बरोबर आहे हे पटकन सांगू शकत नाही. आणि समोरच्याला वाटत असतं की चूक ही आपल्याकडून नाहीतर नेहमी समोरच्या व्यक्तीकडूनच होते. पण अशावेळेस आपल्यात चूक दाखवणारा हा चूक सुधारणाराही असावा. खरंतर आज मी हे चुकीचं पुराण सुरु केलं ते माझ्या एका मैत्रिणीच्या हातून घडलेल्या चुकीमुळे. पण त्याला कारण ती जिकडे काम करत होती ती सिस्टीम आहे. मात्र बोलणे माझ्या मैत्रिणीने खाल्ले आणि अजूनही ते ती सहन करत आहे. आणि काय तर म्हणे तिचे संस्कार तिला काही उलट बोलू देत नाहीत.पण  ही गोष्ट मला तरी अगदी चुकीची वाटली त्यामुळे मी तिला सांगितलं की तू कोणाचीही चूक खपवून घेवू नकोस. तुझ्या कामाशी प्रामाणिक रहा, लोक काय आपल्याला घोड्यावरही चढू देत नाही वा पायीही चालू देत नाही तेव्हा तू आपल्या कार्यक्षेत्रात आधीच ठोस विचार करीत जा. सर्वात महत्वाचे म्हणजे जो कुणी उगाच काही योग्य असूनही  अयोग्य आहे  असं सांगत असेल त्याला योग्य वेळी योग्य उत्तर द्यायला शिक…..तुझं आत्मभान जागतं ठेव, मग बघ समोरच्याला तुझ्या कामात शोधूनसुद्धा चूक काढता येणार नाही. आता तुम्हीच सांगा मी यात काही चुकीचे बोलत आहे काय?                                                                                 -ज्योती कपिले

‘ धडा ‘ कुसुमाकर मासिकातील मनभावन या सदरातील सातवा लेख

kusumakarmasik

             आपण आपलं आयुष्य खूप सहजतेने घेतो, ‘ सब चलता है ‘ असं म्हणत पुढे जातो. आता  कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा कुठलेही नियम तोडणे हे वाईटच! पण आपण मात्र इतक्या सहजतेने नियम तोडत पुढे जात असतो की, आपल्याला लक्षातच येत नाही कि आपण काय करत आहोत ते. आणि जेव्हा आपल्याला आपली ही चूक लक्षात येते तेव्हा कधी आपल्याला ही चूक सुधारायची संधी मिळते तर कधी नाही. पण जगलो-वाचलो तर मात्र हा प्रश्न उरतोच की, ह्या घटनेतून आपण काय शिकलो? आणि काही शिकण्यासाठी आपल्याला काही गमवावंच लागतं का? त्याशिवाय आपल्याला काही ‘धडा ‘ मिळू शकत नाही का?                                                                            काही वर्षांपूर्वी माझे मेहुणे,विकास यांची पुण्याला बाय-पास सर्जरी करायची निश्चित झाल्यावर मला नासिकवरून पुण्याला जायचं होतं. विकासचा मित्र हेमंतही पुण्याला येणार होता. तो आणि त्याची बायको नीता … दोघंच त्यांच्या गाडीने प्रवास करणार होती. त्यामुळे विकासच्या गाडीत गर्दी नको म्हणून मी आणि माझी नणंद हेमंतच्या गाडीने पुण्याला निघालो. वरकरणी गाडीत गप्पा चालू होत्या पण सगळ्यांनाच एक अनामिक हुरहूर लागल्यामुळे प्रत्येकाचं मन अस्वस्थच होतं. विकासला रस्त्यात काही मदत लागली तर आपण जवळ असावं या विचाराने हेमंतने विकासच्या गाडीमागे गाडी ठेवली होती. पण अचानक विकासची गाडी पटकन पुढे निघून गेली. आणि त्यामुळे हेमंतने आपली गाडी जोरात पळवायला सुरुवात केली. मित्राच्या तब्येतीचे हेमंतला खूप टेन्शन होतं. त्यातच आमची गाडी चंदनपुरी घाट चढू लागली. घाट चढत असतांना जरा ट्रॅफिक लागल्यामुळे आणि विरुध्द बाजूने कोणतीही गाडी येत नसल्यामुळे  हेमंतने आपण गाडी त्या साईडने काढावी असा विचार केला आणि तो रस्त्याच्या विरुद्ध बाजूने पुढे जावू लागला. आमची गाडी उजव्या वळणावर वळणार तेवढ्यात समोरचे दृष्य बघून आमचे सर्वांचे डोळे विस्फारले गेले. समोरून एक भलामोठा ट्रेलर येतांना आम्हांला दिसला. एक भलीमोठ्ठी गाडी समोरून येतेय आणि आमची गाडी बाजू घ्यायला जागा नाही,काय करावं या विचाराने आम्ही सगळेच गर्भगळीत झालो. वाटलं, आता आपण ट्रेलरला धडकणार. म्हणजे सगळं संपलंच की. इकडे हेमंतने आणि ट्रेलरच्या ड्रायव्हरने आपापल्या गाड्या कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही टक्कर झाली ती झालीच. गाडीच्या उजव्या साईडला जोरात धक्का बसला आणि खूप ठोकली गेली. माझ्या हातातला फोन खाली पडला आणि तोंडातून ‘गजानन बाबा’ असे शब्द निघाले. पण दुसऱ्या मिनिटाला बघते तर काय अहो आश्चर्य! आम्ही जिवंत होतो. अगदी  ट्रेलरला धडकुनही आम्ही जिवंत होतो. पण सगळे प्रचंड घाबरलेलो होतो. त्या शॉकमधून बाहेर आल्यावर आम्ही कोणाला काय दुखापत झाली हे बघू लागलो. गाडीच्या पुढच्या काचा एकदम तडकल्या होत्या पण नशीब त्या फुटल्या नव्हत्या किंवा हेमंतला लागल्याही नव्हत्या पण त्याला मुका मार बसला होता. त्याच्या मागच्या बाजूला मी बसले होते आणि माझ्या बाजुनेच गाडीला जोरात हिसका बसल्यामुळे माझाही हात थोडा दुखावला गेला होता. माझ्या नंणदेनेही समोर ट्रेलर बघून आता आपले काहीच खरं नाही अस वाटून पण त्यातल्या त्यात थोडी सावधानता म्हणून पुढच्या सीटला पक्क धरून ठेवलं  होतं. तिलाही आपल्याला मुका मार लागलाय हे जाणवलं. मात्र नीताला काहीच लागलं नव्हतं. ट्रेलरचा ड्रायव्हर हेमंतला शिव्या देत होता. आजूबाजूचे लोकही घाटाच्या वळणावर तुम्ही चुकीच्या बाजूने कसे जातात असं आम्हांला ओरडू लागले. पण एकीकडे ते आश्चर्यही व्यक्त करू लागले की,एवढा मोठा अपघात होऊनही तुम्ही सहीसलामत आहात. हो, नाहीतर एखादी कार ट्रेलरवर धडकली की त्या कारचा आणि त्यातल्या लोकांचाही चुरा होणार हे ठरलेलेच असतं. पण केवळ आम्हा चौघांचेही दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो! हेमंत तर काहीएक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फक्त मला माफ करा  असं बोलून गाडी बाजू घेतली. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तेव्हा मग लक्षात आलं की, का आम्ही कुणी हेमंतला तो रॉंग साईडने गाडी चालवतो म्हणून ओरडलो नाही? का आम्ही चूप बसलो? गाडी चालविण्याची घाई करू नको असं त्याला का नाही म्हणालो? किंवा त्याच्याही ते का लक्षात नाही आले? आता ती बोलण्याची वेळ तर निघून गेली होती. पण काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. खरतर विकासच्या काळजीमुळे कोणालाच काहीएक सुचायला, विचार करायला वेळच नव्हता. मात्र त्यावेळी “देव तारी त्याला कोण मारी?”या म्हणीचा आम्हांला प्रत्यय तर आलाच पण गाडी चालवतांना काही एक टेन्शन न घेता फक्त रहदारीच्या नियमानुसारच गाडी चालवायला हवी. नाहीतर …..                                 आता ती वेळ आली नव्हती म्हणून हा कधीही विसरू शकणार नाही असा नियम पालनाचा महत्वाचा धडा तर आम्हांला मिळाला. आणि आपल्याबरोबर हा प्रसंग शेअर करण्याची संधीही…

~ ज्योती कपिले

माझा वॉक…कुसुमाकर मासिकाच्या ‘मनभावन’ ह्या माझ्या सदरातील सहावा लेख

 माझा वॉक…

    दर महिन्याला माझा बारीक होण्यासाठी वॉकला जाण्याचा एकदा तरी संकल्प होतोच. आणि मग सकाळी लवकर उठून माझी रोजची कामं आटपून आमच्या बांद्र्याची शान असलेल्या ‘Bandstand’ या समुद्र किनाऱ्यावर जाण्याची माझी तयारी सुरु होते. तसं ‘Bandstand’ ला जायचं म्हटलं की दोन सिग्नल,दोन शाळा,शाळेला जाणाऱ्या मुलांची, आणि त्यांच्या पालकांची लगबग,रिक्षा,बसेसची गर्दी हा सगळा अडथळा पार करतांना माझा जीव अगदी मेटाकुटीला येतो पण मग दर्शन होतं ते अथांग पसरलेल्या रत्नाकराचं आणि ती गार,प्रसन्न,स्वच्छ हवा अंगावर घेताच मन कसं हरखून जातं. तो क्षितिजापार पसरलेला समुद्र मी डोळ्यात साठवून घेत राहते. तर दूरवर ठिपक्याएवढ्या दिसणाऱ्या मासेमारांच्या बोटी,जहाजं,दीपस्तंभ हे सगळं बघत असतांना मन तिथेच गुंतून राहू पाहतं. कधी नेहमीच्या रस्त्यावर चालू असते ती एखाद्या सिनेमाच्या किंवा सिरीयलच्या शुटींगची गडबड,मग त्यामुळे त्या रस्त्याऐवजी दुसऱ्या पायवाटेने जाण्याचा वैताग येतो पण तरीही तिकडे कोण कोण शुटींग करतंय याची दखल घेण्यासाठी मान वळवून वळवून बघतांना त्यादिवशीपुरता मानेचा व्यायाम केला नाही तरी चालुन जातं. मधेच एखाद्या तानसेनाचा  रियाज करतांनाचा सूर  कानी  पडतो तेव्हा माझ्या मनाला आलेली मरगळ पटकन पळून जाते. आणि आपोआपच त्या सुरांबरोबर मीही गुणगुणत पुढे जावू लागते. तिकडे असलेल्या बागेत हिरवळीवर शांततेत योगाचे क्लास चालू असतात.एकीकडे मात्र कुत्र्याला फिरायला घेवून येणाऱ्यांची ओढाताण पाहून कुत्रा मालकाला घेवून पळतोय का मालक कुत्र्याला घेवून पळतोय हे बघून हसू आल्याशिवाय राहवत नाही. मात्र तरीही ह्या गडबडीत कुणाचा निवांत अभ्यास,कुणाचं पेपर वाचन,कुणाचं हवा खाणं अगदी तब्येतीत चालू असतं. आणि नेमकं अश्यावेळी ‘Bandstand’ वर उघड्यावर एकमेकांना  नको तितकी चिटकून बसलेली जोडपी पाहून फिरण्याच्या मुडच जातो. खरतर पोलिस तर त्यांना नेहेमीच हटकतात पण दोन दिवसात त्यांचे पहिले पाढे पंचावन्न होतात.

एके दिवशी मी वॉक करतांना दुरून मला एक शाळकरी मुलगा आणि मुलगी सकाळीच शाळेचे दप्तर घेवून बेंचवर बसलेले मला दिसायचे. बहुधा शाळा बुडवून ते दोघं तिकडे येत असावीत. एकदा माझ्या मनात विचार आला की,ह्या मुलांच्या जवळ जाऊन निदान एकदा तरी आपुलकीने सांगावं….बाळांनो…तुम्ही  जे करत आहेत ते चुकीचं आहे अस्म सांगून जबाबदार नागरीकाचं कर्तव्य पार पाडायला हवं. मग त्यांच्याशी बोलण्यासाठी मी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव त्यांच्याकडे निघाले इतक्यात भिकाऱ्यांच्या लहान मुलांच्या टोळीने त्या दोघांना….’कुछ पैसा दो ना’ असं म्हणत अगदी हैराण करून टाकलं होतं आणि मी तिकडे पोहचण्याच्या आधीच ती शाळकरी मुलं तिकडून निघून गेली होती. तेव्हा वाटलं ह्या अश्या लहानग्या मुलामुलींना इकडून उठविण्यासाठी काहींना खास ट्रेन करूनच ठेवायलाच हवं, नाही कां?

मात्र हे सगळं बघून एकदा वर्तमानपत्रात वाचलेलं आठवलं की, Bandstand च्या खडकांवर बसलेलं एक जोडपं एकमेकात इतकं हरवून गेल होतं की त्यांच्या सभोवताली कधी भरतीचे पाणी भरलं, हे त्यांना कळलंच नाही. जेव्हा जीवावर बेतलं तेव्हा ते भानावर आले मग सुरु झाला त्यांचा आरडा ओरडा, मग पोलीस आले,अग्निशामक दल आलं आणि मग कुठे म्हणे त्या दोघांची सुटका झाली. नंतर पोलीस तपासात हे सत्य समोर आलं कि, मुंबईतील काडेपेटीच्या आकाराच्या घरात एकत्र कुटुंबात राहणारे ते दोघे खरोखरीचे नवराबायको होते आणि मनाचा कोंडमारा दूर करण्यासाठी ती अशी आठ दिवसातून एकदा इकडे भेटत होती…

            माझं वॉक आणि विचार करणं चालू होतच. तेवढ्यात समोर खडकांच्या जवळ एक काही वेगळ्याच रंगबेरंगी फुलांचं झाड दिसलं.आता हे कुठलं झाड बुवा, असा विचार करत मी त्या झाडाच्या जवळ जाऊन बघते तर काय, त्या हिरव्या झुडूपांवर समुद्राच्या पोटातील अनावश्यक वस्तूंचे म्हणजे कचऱ्यांचे,प्लास्टिकचे तुकडे बहुधा भरतीच्या वेळी येवून चिकटून बसलेले दिसत होते. आणि दुरून ते रंगबेरंगी फुलांसारखे दिसत होते. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास बघून माझं मन विषण्ण झालं, कळत नकळत आपल्या हातून होणाऱ्या ह्या चुका आपल्याला किती महाग पडणार आहेत आणि हे आपल्या कधी लक्षात येणार आहे कुणास ठाऊक?

मैत्र जीवाचे… कुसुमाकर मासिकाच्या ‘मनभावन’ ह्या माझ्या सदरातील पाचवा लेख

kusumakarmasik

मैत्र जीवाचे…

जीवनाच्या वाटेवर चालताना खूप माणसं आपल्याला भेटतात पण प्रत्येकाशीच आपली नाळ जुळेल किंवा मनभावन मैत्री होईल याची काही खात्री देता येत नाही. कारण मैत्री ही कधी ठरवून करता येत नाही, मैत्रीच्या तारा ह्या जुळाव्या लागतात.  खरतर कधी आपल्याला वाटतं कि आपली समोरच्याशी मैत्री आहे पण मग का कुणास ठाऊक त्याच्याकडून काही अपरिहार्य कारणांमुळे आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद येत नाही मग ते मैत्रीचं फुल सुकून जात. मन उदासून जातं. पण  कधी कधी आपल्याला असाही प्रत्यय येतो कि मैत्रीचं नातं हे पण असचं स्वर्गातून गाठी बांधून येत असावं आणि याचा मला एकदा नाही तर चांगला दोनदा प्रत्यय आला आहे.  

झालं असं, मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष दशरथ तळेकर यांनी घेतलेल्या काव्यस्पर्धेत मी भाग घेतला आणि पदार्पणातच माझ्या माधुरी दीक्षितवरच्या कवितेला तिसरा पुरस्कार  मिळाला. आणि ह्याच घटनेमुळे प्रोत्साहन मिळून माझी गाडी साहित्याच्या वाटेवर चालू लागली. त्यांच्या लेख स्पर्धेतही मला दुसरा पुरस्कार मिळाला. त्या समारंभास मी गेले असता ‘कुटुंब रंगलाय काव्यात’ याचे जनक विसुभाऊ  बापट यांनी मला विचारलं, ‘काय एकट्याच आल्यात?’ मी म्हणाले,‘ हो, कोणी सोबत नव्हतं’. तेव्हा ते म्हणाले, ‘का,साहित्य क्षेत्रात कोणी मैत्रीण नाही का तुम्हांला?’ आता जेव्हा विसुभाऊ यांनी मला हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांना देण्यासाठी माझ्याकडे फक्त नाही हेच उत्तर होतं. कारण मला लहानपणापासून कधीच कुणी खास, जिवलग मैत्रीण नव्हती. शाळेतल्या मैत्रिणी ह्या फक्त शाळेपुरत्याच होत्या कारण माझं घरच एक गोकुळ होतं; जिथे सख्या-आत्ये-मामे-चुलत-नीलत अशा सगळ्या बहिणींचा सतत राबता असायचा त्यामुळे आणि शाळेनंतर मैत्रिणींची जागा घ्यायच्या माझ्या बहिणी. मला  पुस्तकं वाचण्याचं वेड खूप होतं आणि तशी मला फारशी फिरायचीही आवड नव्हती. आणि गेलोच तर आम्ही घरातले सगळे एकत्रच  फिरायला,जेवायला वा सिनेमाला जायचो  त्यामुळे मला कधी कुणी खास मैत्रीण असायला हवी, असं कधी वाटलच नाही.                                    

पण आज मात्र मला अशी कुणी खास,जिवलग मैत्रीण पाहिजे होती असं वाटू लागलं. मग मी विसुभाऊ बापट यांना मी साहित्य क्षेत्रात नवीन असल्याकारणे मला अजून कोणी मैत्रीण नाही असं सांगितलं आणि मी माझ्या डोळ्याच्या कडा हळूच टिपल्या. कार्यक्रम संपला तेव्हा दुरून एक एक पुरस्कार विजेती आपल्या नवऱ्याबरोबर तिकडे आलेली मला दिसली.  मी मनात म्हटलेही कि चांगलं आहे हिचा नवरा तरी आहे हिच्याबरोबर….. अर्थात माझा नवरा माझ्याबरोबर आला नाही कारण समारंभाला मुलं कंटाळतात म्हणून तो घरीच मुलं सांभाळत होता.                   

दुसऱ्या दिवशी मी फोनवरून तळेकर दादांना विसुभाऊ बापट मला काय म्हणाले हे सांगत असता त्यांनी मला ‘संगीता अरबुने’ ह्या कवयित्रीबद्दल सांगितलं आणि म्हणाले ती स्वभावाने चांगली आहे आणि  तुमची एकमेकींची चांगली मैत्रीही होऊ शकते. लवकरच आपल्या समितीतर्फे  तिचा काव्यसंग्रह येतोय,तुम्ही या त्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला, मी तुमच्या दोघीची भेट घालून देतो…..नंतर आम्ही भेटलो मग मला लक्षात आलं त्या दिवशीच्या समारंभात भेटलेली ती पुरस्कार विजेती ती हीच…. मग आम्ही नेहमी कवितांच्या कार्यक्रमास भेटू लागलो, फोनवर बोलू लागलो,आणि पुढे इतिहास घडला…..आज आपल्या सर्वांना महिती आहे त्याप्रमाणे संगीता माझी अगदी प्रिय सखी आहे.                                                                                          

खरतर आमची अभिव्यक्ती,स्वभाव,वागणं-बोलणं  खूप वेगळं आहे पण कवितेमुळे आम्ही बांधले गेलो आणि एकमेकींच्या सहवासात आमची मैत्री फुलली तिच्या मार्गदर्शनाने माझी कविता फुलत गेली. जीवन समृद्ध होत होत गेलं.                                                              

तशीच मला दुसरी प्रिय सखी भेटली ती म्हणजे ‘गौरी कुलकर्णी’ साहित्याच्या वाटेवर चालतांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रुपानं माझ्या जीवनात एक वेगळं वळण आलं. त्या संस्थेत काम करताना वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटत गेले. माझ्या साध्या-सरळ स्वभावामुळे,विचारांमुळे मी कधी मोठ्या प्रमाणात काही संस्थात्मक काम करेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण संस्थेचं सदस्य असल्यावर काम तर करायला लागत होतं. गौरीताईबरोबर काम करतांना तिने कळत नकळत माझ्यावर विश्वास टाकला. मला कोमसापच्या प्रत्येक कामात सहभागी करत गेली, काम शिकवत गेली. मी तिला माझ्या परीने सहकार्य करत गेले आणि इकडेही पुढे इतिहास घडला…..तिच्या आग्रहामुळेच मी कोमसाप वांद्रे शाखेची अध्यक्ष झाले.  आज मी मागे वळून बघते तेव्हा मला लक्षात येतं या दोघी नसत्या तर मी आज जे काही आहे, जी काही माझी प्रगती झाली आहे, ती झाली असती कां?  त्या  दोघींचे आपापल्या कार्यक्षेत्रात एक अढळ स्थान आहे.एक १५ वर्षापासून माझी मैत्रीण आहे तर एक ५  वर्षापासून. एकीकडून मी कविता कशी मन लावून लिहावी,सादर करावी हे शिकले तर दुसरीकडून मी हे संस्थात्मक काम कसं करावं हे शिकले. तशा माझ्या सगळ्याच मैत्रिणी खूप चांगल्या आहेत. प्रत्येकीकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे, मिळत आहे. सगळ्याच मला खूप जीव लावतात…. पण ह्या दोघींची गोष्ट काही औरच आहे…..देव करो माझ्या मैत्रीची फुलबाग अशीच फुलत राहो, बहरत राहो हीच मैत्री दिनानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना …..आमेन…..!

friends-GJS

एक दाद अशी तर एक तशी… → ‘मनभावन’ ह्या माझ्या कुसुमाकर मासिकाच्या सदरातील चवथा लेख

kusumakarmasikएक दाद अशी तर एक तशी…
गझल मुशायरा किंवा हिंदी कवीसंमेलनात खूप छान माहौल असतो. कवींच्या कवितेला,शेरांना खूप मस्त ‘दाद’ अर्थात ‘प्रतिसाद’ मिळत असतो आणि कवी-कवयित्रीही अगदी मन:पूर्वक काव्यगोष्टी करण्यात रमलेले असतात तर रसिक श्रोत्यांचं काव्याचा आनंद घेवून एकीकडे ‘इर्शाद,वाह वा ,क्या बात है, सुभान अल्ला… अशी दाद वर दाद देणं चालू असतं. विविध शेरोशायरीची रेलचेल असते. अगदी जिवंत वातावरण असतं ते.. आणि हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या दोन वेगवेगळ्या कवितेला उत्स्फूर्तपणे,नोंद घेण्यासारखी मिळालेली एक दाद अशी तर एक दाद तशी…
झालं काय, वाचता वाचता मी लिहू लागले आणि कविता माझी प्रिय सखी झाली. मग कवितेमुळे एकेक मैत्र मिळत गेले  आणि साहित्याने,मैत्रीने माझं जीवन समृध्द होत गेलं. हळूहळू मला काव्य संमेलनाचे आमंत्रण मिळू लागले. मी कविता सादर करण्यास जाऊ लागले. माझ्या कविता श्रोत्यांना आवडू लागल्या.अर्थात हे मी मला वेळोवेळी मिळत गेलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दाद किंवा प्रतिक्रियेमुळे म्हणू शकते.
दाद-टाळ्या हे कवी-कवयित्रीचे टोनिक (Tonic) असतं. ‘दाद’ एक शाबासकी असते, एक प्रोत्साहन असतं. दाद ही काव्यवेलीसाठी अमृतही असतं. पण कधी श्रोत्यांची दाद ही नि:शब्दही असू असते. हे मात्र माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं.
झालं असं…एका कविसंमेलनात मी माझी नेत्रदानावरची कविता सादर केली , माझ्या कवितेत मी म्हणत होते की, ‘ देवा,मला असं मरण दे कि मला माझ्या मरणानंतर माझे डोळे दान करता आले पाहिजे….’ कविता संपली. पण लोकांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.किंवा ‘दाद’ही दिली नाही. नाही म्हणायला एक दोन टाळ्या वाजल्या, मी मनातून थोडी खट्टू झाले. आशेने सूत्रसंचालिकेकडे बघितलं तर ती सूत्रसंचालिकाही माझ्या कवितेला काय दाद द्यावी या संभ्रमात पडलेली मला भासली. कारण तिनेही माझ्या कवितेवर काही एक भाष्य न करता लगेचच दुसऱ्या कवीला बोलावलं. मी विचारात पडले. अरे मी तर कविता चांगली सादर केली पण मग सगळे एवढे गप्प का? म्हणजे माझं चुकलं तर काय चुकलं? नंतर जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा मात्र त्या सूत्रसंचालिकेने स्वत:हून खुलासा केला कि तुझी कविता चांगली आहे पण त्या कवितेला दाद देणं मला जरा कठीण झालं कारण तुझ्या  कवितेचा विषय ….
मी समजून घेतलं  कि माझ्या त्या सूत्र संचालिकेला आणि श्रोत्यांनाही माझ्या कवितेच्या विषयामुळे काही बोलणं,दाद देणं अवघड झालं असावं. मी फक्त समंजसपणे हसले. आणि मनात म्हटलं कि खरच ‘मरण’ हा विषय असा आहे कि, त्यावरील माझ्या कवितेला मिळणारी दाद एवढी निशब्द असू शकते, तर…..आता मात्र मी जेव्हा कधी ती कविता संमेलनात म्हणते तेव्हा तेव्हा त्या कवितेला कोणी टाळ्या वाजवणार नाही हे गृहीत धरते. असो.
अशीच एक वेगळी आणि अविस्मरणीय दाद माझ्या माधुरी दीक्षितला लिहिलेल्या ‘प्रेमळ गाऱ्हाणं’ या कवितेला मिळालेली आहे. त्या कवितेचा विषय हा तिरकस विनोदावर आधारित असून त्यात नवरा कसा आपल्या बायकोला सोडून माधुरीचा दिवाना झालेला आहे हे मी त्यात वर्णन केलं होतं. आणि शेवटी सगळे नवरे कसे एक सारखेच असतात अर्थात,देखणी बायको दुसऱ्याची किंवा घरोघरी मातीच्या चुली असतात असं मी कवितेत म्हटलेलं आहे. माझी ती कविता स्त्री वर्गाला विशेष करून आवडते. मी माझी कविता सादर केल्यावर , माझ्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि जे सूत्र संचालक होते ते म्हणाले कि ह्यांची माधुरी दीक्षित वरील कविता छान म्हणजे अगदी वास्तववादी आहे…आणि त्याचवेळी श्रोत्यामधून एक आवाज आला, वास्तववादी? नाही नाही,अहो विस्तववादी कविता म्हणा विस्तववादी! आता ही दाद ऐकताच सगळे श्रोते परत हसू लागले.. आणि अर्थातच मीही ती उत्स्फूर्त दाद ऐकून आणि तीही एका पुरुषाकडून मिळाली आहे हे ऐकून  हसू लागले…म्हणजे माधुरी दीक्षितला लिहिलेली ‘प्रेमळ गाऱ्हाणं’ ही कविता तर माझी मनभावन आहेच पण त्या कवितेला मिळालेली ती ‘विस्तववादी’ दादही आता माझ्यासाठी मनभावन झालेली आहे.
———————————————————————————————————-

‘मनभावन’ ह्या माझ्या कुसुमाकर मासिकाच्या सदरातील तिसरा लेख – ‘सार्थक’

Image

‘सार्थक’
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाकडून कळत नकळत पण  वेळोवेळी आपल्याला खूप काही मिळत असतं मग अशावेळी आपलही कर्तव्य असतं की आपण स्वत:ही  समाजाला काहीतरी द्यावं क़दाचित दानाची संकल्पना यातूनच उदयाला आली असावी. आणि  ह्याच भावनेतून मी माझ्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. ( अर्थात आता त्याला सात वर्ष झाली) तसं उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये असं म्हणतात,पण नेत्रदानाच्या बाबतीत मात्र आपल्याला तसं  करून चालणार नाही कारण इथे आपण फक्त नेत्रदानाचा संकल्प करू शकतो. प्रत्यक्ष नेत्रदान तर आपल्या मरणानंतरच होऊ शकतं. आणि त्यामुळे मी माझ्या मुलांना माझं मरणोत्तर नेत्रदानाच्या संकल्पाबद्दल सांगितलं
त्यावेळी गौरी,माझी मुलगी अकरावीला होती. तिने एक दिवस मला तिच्या इंग्रजी पुस्तकातील Eyes Immortal नावाची एक अतिशय अप्रतिम,आणि  आपण नेत्रदान का करावं यासंबधीची कविता वाचायला दिली. खरोखर ती इंग्रजी  कविता अतिशय मनभावन होती. ती कविता मराठीत यावी असे मला उत्कटतेनं वाटलं. मी मुलीला म्हटलं की ही  कविता तू मराठीत अनुवाद कर. पण त्यावर ती म्हणाली की,’आई कवयित्री तू आहेस तेव्हा तूच अनुवाद कर.’ मी बरं म्हटलं खरं,कविताही तशी सोपी होती पण ज्या भाषेचा अनुवाद करायचा ती भाषा चांगली आली पाहिजे असं ऐकून असल्यामुळे मात्र मी विचारात पडले आणि आपल्याला काही अनुवाद करता येणार नाही असा विचार करून गप्प बसले. पण मात्र त्या कवितेचा अनुवाद व्हायला पाहिजे असं सारखं वाटत राहिलं.
एकदा वाटलं की सुप्रसिद्ध अनुवादक निरंजन उजगरे यांना ही कविता अनुवादित करायला सांगावी,पण विचार केला की,त्यांची माझी काही ओळख नाही कदाचित पहिल्याच भेटीत त्यांना असं सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास होऊ शकतं मग मी तो विचारही सोडून दिला
काही काळाने एका दिवाळी अंकात सुप्रसिध्द कवी दासू वैद्य यांनी अनुवादित केलेल्या ‘पुस्तकं’ ह्या अनुवादित कवितेच्या जन्माची कहाणी,मूळ कविता आणि अनुवादित कविता असं सगळं वाचायला मिळालं. ते मी वाचलं तो लेख मला खूप आवडला. आणि मला जणू  काही अनुवाद कसा करावा याची गुरुकिल्ली गवसल्याचा आनंद झाला.  त्या कवितेच्या कहाणीचे मी पारायण करत असता  एका सुंदर क्षणी माझ्या हातून Eyes Immortal ह्या इंग्रजी कवितेचा ‘अमर डोळे’ या नावाने मराठीत अनुवाद कागदावर उतरत गेला, मग तो अनुवाद एक-दोन जणांना दाखवला त्यांनीही तो चांगला झाल्याचे सांगितले आणि मग मी तो अनुवाद,मूळ कविता धाडस करून  दासू वैद्य यांनाच तपासायला पाठवली….त्यांनीही अनुवाद चालण्यासारखा आहे हे लगेचच पत्राने कळविले. आणि मग माझं त्या कवितेच्या अनुवादाबद्दल थोड फार समाधान झालं.
नंतर मी मूळ कवी वासुदेव निर्मल यांचा पत्ता शोधला,त्यांची रीतसर परवानगी घेतली.  ती कविता सर्वप्रथम ‘कुसुमाकर’ मध्येच प्रकाशित झाली होती. कविता सर्वांनाच आवडली.  आणि मग मी त्या कवितेचं पोस्टर बनवून ती सर्वदूर पोहचवावी असा विचार केला. तेव्हा कवी मनोहर मंडवाले यांनी त्या कवितेचं एक आकर्षक पोस्टर बनवून दिलं. मग ती नेत्रदानाच महत्व सांगणारी कविता सगळ्यांपर्यंत पोहचावी,नेत्रदानाचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून मी त्या  पोस्टरच्या कॉप्या बनवून,सामाजिक बांधिलकी म्हणून ठिकठिकाणी सप्रेम भेट देत गेले ..
त्यामुळे मंडवाले यांनीही त्या कवितेच्या डिझाईनचे पैसे घेतले नाही.
माझ्या भावाच्या मित्राची बायको डोळ्याची डॉक्टर आहे , तिच्या दवाखान्यात ते पोस्टर द्यावं म्हणून मग मी नासिकला माहेरी जातांना घेवून गेले.आणि ती कविता,ते पोस्टर आईला दाखवले. ती कविता वाचताच आई चक्क रडू लागली, मी तिला कारण विचारताच ती मला म्हणाली की, आता मलाही नेत्रदान करायचं!’ तेव्हा हे ऐकताच मला आश्चर्य वाटलं  कारण जेव्हा मी तिला माझ्या नेत्रदानाच्या संकल्पाबद्दल सांगितले तेव्हा ती मला ओरडली होती पण आज ती स्वत: मला नेत्रदान करायचं असं म्हणाली आणि त्या कवितेच्या,साहित्याच्या ताकदीचा मला पुन्हा एकदा सुखद प्रत्यय आला.आणि मी ज्या भावनेने ह्या  कवितेचा अनुवाद केला तो सफल झाला,त्याचं ‘सार्थक’ झालं असं मला वाटून गेलं. आणि आता या कवितेचा हिंदीतही अनुवाद करायला हवा असा विचार केला.

ज्योती कपिले

Image