श्रीमती कमला मेहता अंधशाळा,दादर – एक अविस्मरणीय अनुभव…


एकदा एकनाथ आव्हाड यांचा फोन आला,”अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला दादर-अंधशाळा शाखा आणि ज्ञानयोग सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने दादरला श्रीमती कमला मेहता अंध शाळेत दहावीच्या विद्यार्थिनींचा गुण गौरवाचा सोहळा,सत्कार आहे. माझे आणि तानाजी सावंत यांचे तुम्हांला तिकडे कविता सादर करण्याचे आमंत्रणही आहे तेव्हा जरूर या.”
मला कधीपासून श्रीमती कमला मेहता अंध शाळेत जायचे होतं,पण काहींकाही कारणानं सारखं राहून जायचं पण आता हा जुळून आलेला योग मला हातचा दवडायचा नव्हता.त्यामुळे मी मी लगेचच हो म्हटलं. कार्यक्रमाच्या दिवशी बरोबर पाच वाजता शाळेत पोहचले पण मुख्य पाहुणे आले नसल्यामुळे कार्यक्रम सुरु झाला नव्हता. त्यामुळे स्टेजवर पंधरा-सोळा अंध मुली तबला,झांझ,माईक आदी घेवून पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अगदी तयारीनिशी बसल्या होत्या.पण कार्यक्रम सुरु झाला नसल्याकारणे एकमेकीशी गप्पा मारण्यात मग्न होत्या.
लवकरच मुख्य पाहुण्या आल्या आणि कार्यक्रम सुरु झाला. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मुलींनी स्वागतगीत सुरु म्हणण्यास सुरुवात केली खरा तो एकची धर्म,प्रिय आमुचे सानेगुरुजी,आता उठवू सारे रान आणि बलसागर भारत होवो. अशी साने गुरुजींची एकसे बढकर एक गाणी अंध मुलींनी अगदी सुरेल आवाजात आणि न चुकता सादर केलीत. त्यांचे पाठांतर बघून,ऐकून माझं मन थक्क झालं. गाणं म्हणतांना तबला वाजवणाऱ्या मुलीने इतका सुंदर तबला वाजवला की बस. त्या अंध मुलींच्या अंगातील कलेचे एक सुंदर प्रदर्शन त्यावेळी तिकडे बघायला मिळाले.वाटलं हा देव पण ना, एक हाताने घेतो तर दुसऱ्या हाताने बरच काही देतो.
स्वागतगीतांचा कार्यक्रम संपल्यावर प्रथम स्टेजवरची एक मुलगी आपल्या मदतनीस ताईच्या मदतीने खाली उतरली आणि मग नंतर त्या मुलीचा हात धरून एकेक मुलगी अत्यंत सफाईने,हसत खेळत खाली उतरत गेली मी पुढच्या रांगेत बसली असल्याकारणे त्या मुलींचं को-ऑर्डिनेशन मला इतकं जवळून बघायला मिळालं खाली उतरल्यावर त्या मुली त्याच चपळाईने रांगेत मागच्या बाकांवर जावून बसल्या.कुठेही गडबड नाही,गोंधळ नाही, की धडपडणेही नाही. ते सगळं बघून मी अगदी आश्चर्यचकित झाले. मला माझ्याच डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं. त्या मुलींचे आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षिकांचे मनोबल,कसब अगदी वाखाणण्यासारखे होते. सगळ्या मुली खाली उतरल्य़ा पण तबला वाजविणारी मुलगी मात्र स्टेजवरच बसून राहिली याच कोडं मात्र मला उमगल नाही. त्यानंतर सुरु झालं ते आम्हां आमंत्रित कवींचे काव्यवाचन,खरेतर संयोजकांनी मला बालकविता म्हणायला सांगितली होती पण मी मात्र “अमर डोळे” ही नेत्रदानावरची अनुवादित कविता म्हटली. कारण मला त्या अंध मुलींना एक दिलासा,एक विश्वास द्यायचा होता की,आम्हांला तुमची काळजी आहे,आम्ही तुमचा विचार करतो,आमची ही इच्छा आहे की आमचे डोळे मरणानंतर कुणा नेत्राहीनाना दान व्हावेत. ती अनुवादित कविता ऐकल्यावर एक क्षण सगळेच निशब्द होते. पण तिथे आलेले अंध मुलींचे पालक मात्र आपल्या डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत असलेले मला जाणवले. खरचं जेव्हा पालकच आशावादी असतात,त्यांची जीवनेच्छा चिवट असते तेव्हाच तर त्यांचं मुल प्रवाहाविरुध्द पोहतं,यशाचं मानकरी होतं!
नंतर डॉ सुमन नवलकर,रमेश तांबे यांनी बालकविता म्हणून दाखवल्या. त्यांच्या विनोदी कवितेंना मुलीनी खूप हसून,टाळ्या वाजवून दाद दिली. तर एकनाथ आव्हाड यांनी आपल्या कथाकथनातून “यश हे चिकाटीला चिकटलेले असते “असा महत्वाचा संदेश मुलींना देऊन एक भावस्पर्शी कविताही मुलींना ऐकवली.
त्यानंतर बालविकास मासिकाचे संपादक श्री. यशवंतराव क्षीरसागर यांनी साने गुरुजींच्या आठवणी सांगितल्या.
श्रीमती कुंदाताई आजगावकर यांचे भाषण ऐकुन मला त्या कशा श्रीमती कमला मेहता अंध शाळेत रीडर म्हणून कामाला लागल्या आणि आज त्या शाळेच्या संचालिका म्हणून काम करत आहेत. हे समजले. केवढे हे सर्मपण! मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटले,कौतुक वाटले. ही जीवनावरील श्रद्धा! ही सामाजिक जाणीव. मला तर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटले.
त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याधापिका असलेल्या श्रीमती उमाताई मुंबईकर चवथीत असल्यापासून ह्या शाळेत शिकल्या आहेत. शिवाय काळाबरोबर चालण्यासाठी,टेक्नॉलॉजीत मागे पडू नये म्हणून काही विद्यार्थिनी बरोबर त्या स्वत:ही MS-CIT चा कोर्स करीत आहेत. कुठून येते ही जिद्द? हा संकटाला सामोरे जायचा निश्चय?
नंतर सुरु झाला तो मुख्य सोहळा,दहावीच्या विद्यार्थिनींचा गुण गौरव समारंभ. शाळेचा रिझल्ट गेले कित्येक वर्षे १००%च लागत आहे.ह्या वर्षी शाळेत पहिल्या आलेल्या मुलीला ८२% गुण मिळाले होते. पालक,रीडर,रायटर आणि शिक्षिका यांच्या मदतीने शाळेतील अंध मुली प्रगतीचे नवनवे दरवाजे उघडत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समारंभास मुंबई महानगर पालिकेच्या उप शिक्षणाधिकारी सुखदा लाड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी अंध मुलींचे कौतुक करून त्यांना संस्थेचे पुरस्कार तर दिलेच पण प्रथम येणाऱ्या मुलीला दरवर्षी व्ययक्तिक पुरस्कार देण्याची घोषणा करुन त्या घोषणॆची लागलीच अंमलबजावणीही केली आणि आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडवले. हॉल मध्ये टाळ्यांचा गजर होत होता आणि साथीला असलेले तबल्याचे बोल आसमंतात घुमत होते. आणि मग मात्र ते तबल्यावरची थाप ऐकताच मला ते सुरुवातीला पडलेलं कोडं आता अलगद उलगडल होतं. ती मनापासून हसणारी तबला वादक तिच्या परीने उपस्थितांच्या टाळ्यांना,आपल्या मैत्रिणींच्या कौतुकाला तबल्याच्या बोलाने दाद देत होती. तो तबल्याचा आणि टाळ्यांचा आवाज अंगांवर रोमांच उभा करीत होता. ते दृश्य ऐकून,बघून मन अगदी भरून आले होते.
या प्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याधापिका उमा मुंबईकर,संचालिका कुंदा आजगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद पालकर उपस्थित होते.
अ. भा.सानेगुरुजी कथामाला दादर-अंधशाळा शाखेचे प्रमुख कार्यवाह तानाजी सावंत आणि ज्ञानयोग सामाजिक संस्थेचे रमेश कार्लेकर यांनी आस्थापूर्वक हा अंध मुलींचे कौतुकसोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. घरी येतांना मी विचार करीत होते.अंध असून ह्या मुली किती डोळसपणे यशस्वी जीवन जगत आहेत आणि आपण मात्र कधी कधी डोळे असूनही ….
आता आम्ही दोघा-तिघांनी मिळून ठरवलय की दोन-तीन महिन्याने श्रीमती कमला मेहता अंध शाळेत जाऊन,त्या मुलींचे मनोरंजन करायचे,त्यांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद फुलवायचा…

Advertisements

4 responses to “श्रीमती कमला मेहता अंधशाळा,दादर – एक अविस्मरणीय अनुभव…

  1. छान. अशा जगात रमायचे म्हणजे त्यासाठी ही एक कविमन लागते. फार छान वाटले तुम्ही तिथे गेलात हे वाचून.

  2. धन्यवाद सर …खरच खुप आनंद झाला अंध शाळेत जावून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s