“वसंतोत्सव आरंभ”

 Image

( २८ मार्च २०१३. वेळ रात्री ९ वाजता.आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर “ऐसी अक्षरे रसिके” या कार्यक्रमांतर्गत असलेला ललितबंध )

“वसंतोत्सव आरंभ” 

फाल्गुन महिन्यातील होळीपौर्णिमेच्या पाठोपाठ येणाऱ्या धूलिवंदनापासून ह्या  सृष्टीच्या मदनसख्याचं, ऋतुराज वसंताचं आगमन होते,अर्थात वसंतोत्सवास आरंभ होतो,सृष्टीच्या नवनिर्मितीचा सोहळयास प्रारंभ होतो.   

वसंत ऋतूत सृष्टी तिच्या सौदर्यांच्या अत्युच्च स्थानावर असते. ह्या मधुमासाच्या आगमनाबरोबरच सगळीकडे नवचैतन्याची एक लहर पसरते. झाडांना पालवी फुटते. नवजन्माचं गीत आळवलं जातं. आंब्याचा मोहर घमघमतो. कोकीळ आदी पक्ष्यांचे स्वर आर्त, प्रणयाने ओथंबतात.                                            

चैत्र-वैशाखाचे हे पेटत ऊन अंगावर झेलत, वसंतऋतू रंग अन्‌ सुगंधांची उधळण करीत असतो. कोवळ्या पालवीसवे हळुवारपणे फुलंही उमलू लागतात. वैशाखाच्या प्रखर उन्हात केवळ पांढरा, लाल, तपकिरी, आणि केशरी रंगच तग धरु शकतात त्यामुळेच वसंतात या रंगांची फुले दिसतात. आता खरा वसंतोत्सव अनुभवायचा असेल तर मात्र रानावनात, जंगलातच जायला हवं. जंगलात तर ठिकठिकाणी होळीचा गुलाल लेवून लाजेने लालीलाल झालेली झाडं जागोजागी उभी राहिलेली दिसतात. केशरी पळस, लाल पांगरा,  पांढरा करंज, रातराणी, कुंकुम, गडद गुलाबी आणि  लालसर रंगाची फुलं लेवून  अंगोपांगी बहरलेली काटेसावर आणि घाणेरीची नाजूक डाळिंबी रंगाची फुलं आता नावं तरी किती घेणार? सगळी झाडं  नुसती फुलांनी बहरलेली असतात.  पण या सर्वांत खुलून दिसतो तो म्हणजे पळस. हा पळस एखाद्या ज्वालेप्रमाणे एवढा फुलतो,एवढा चमकतो की जणू काही उन्हाने पेटलेलाच आहे. वाटतं जंगलाला आग लागली आहे की काय? आणि  म्हणूनच कदाचित पळसाला वनाग्नी किंवा फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात. कोणी काही म्हणोत, पण जंगलाला, पळसाशिवाय शोभा नाही हेच खरं!     

    बरं,कोकणात जेव्हा शिमग्याचे ढोल वाजू लागतात तेव्हा, पांगाऱ्याचं झाड  अंगभर कोंबड्याच्या लालभडक तुऱ्यासारखी शेकडो फुलं लेऊन कुंकवाची उधळण करत रस्त्याच्या कडेला उभं असलेलं  आपल्याला दिसतं. त्याचं सौंदर्यही नजरेत न मावण्यासारखं असतं. त्याचप्रमाणे शेवरी किंवा काटेसावरीचं झाड हे ही ह्या  महिन्यात अस्स काही फुलून येतं न की त्याच्याकडे डोळे भरून नुसतं बघत राहावंस वाटतं. त्याची ती गोल गुलाबी फुलं,त्यांचा मोहक आकार, मोठ्या पाकळ्या, पुंकेसरांचे पुंजके  यामुळे शेवरीचं हे फूल इतर सर्व फुलांमध्ये अधिक सुंदर भासतं. शेवरीच्या ह्या निष्पर्ण वृक्षावर अक्षरश: फुलांचे घोस लटकलेले असतात. जरासं थांबून,थबकून पाहिलंच पाहिजे असं हे सृष्टीचं रंगभरलं रूप जसं माणसांना भावतं नं,तसंच ते पशु-पक्षांनाही भावतं. एरवी या काटेरी झाडांकडे ढुंकूनही न पाहणारे पक्षी फुलातील मधामुळे झाडाकडे आकर्षित होतात. फुलांच्या ह्या विविधरंगी सजावटीबरोबरच,पिलांच्या छोट्या कोवळ्या किलबिलीचे गुंजनही झाडांवर सुरू होतं. थेट मलेशियातून पळसमैना फुलांतील मकरंद चाखण्यासाठी भारतात दाखल होतात. चकाकणाऱ्या पंखांच्या सूर्यपक्ष्यांमुळे  फुललेल्या झाडांना चैतन्य प्राप्त होतं. ह्या शेवरीची फळं पिकू लागली की, त्यातून बाहेर पडणारा कापूस भिरभिरत रानभर फिरू लागतो. मग तो मऊ मुलायम कापूस गोळा करण्याची किंवा हे ‘म्हातारीचे केस’ पकडण्याची मजा काही औरच!   

       फक्त आपल्याला जीवनातील नैराश्य झटकून निसर्गाच्या ह्या आनंदोत्सवात सहभागी होता आलं पाहिजे आणि सृष्टीत फुललेल्या वसंताचं, ह्या सौंदर्योत्सवाचं भरभरून प्राशन करून आपल्या मनातही वसंत फुलविता आला पाहिजे. हो ना?

Image

Image

Advertisements

2 responses to ““वसंतोत्सव आरंभ”

  1. Khup sundar lalitbandh

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s