एक अविस्मरणीय अनुभव

Image

एक अविस्मरणीय अनुभव :

कधीपासून मला दादरच्या कमला मेहता अंध शाळेत जायचे होतं,पण काही कारणानं सारखं राहून जायचं.अशातच एकदा एक फोन आला, कमला मेहता शाळेत दहावीच्या विद्यार्थिनींचा गुण गौरवाचा सोहळा असून त्यावेळी कविसंमेलनही आहे तेव्हा तुम्ही तिकडे जरूर या.”

आता हा सुंदर जुळून आलेला योग मला हातचा दवडायचा नव्हता.त्यामुळे मी लगेचच हो म्हटलं. कार्यक्रमाच्या दिवशी बरोबर वेळेत शाळेत पोहचले पण कार्यक्रम अजून सुरु झाला नव्हता. पण स्टेजवर पंधरा-सोळा अंध मुली तबला,झांझ आदी वाद्य हातात घेवून एकमेकीशी गप्पा मारण्यात मग्न होत्या.

थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि त्या मुलींनी साने गुरुजींची एकसे बढकर एक गाणी अगदी सुरेल आवाजात आणि न चुकता सादर केली. त्यांचे पाठांतर बघून माझं मन थक्कच झालं. इतर मुली गाणं म्हणतांना तबला वाजवणाऱ्या मुलीनं इतकी सुंदर साथ दिली की बस. त्या  मुलींच्या अंगातील कलेचं एक सुंदर प्रदर्शन त्यावेळी तिकडे बघायला मिळालं. स्वागतगीतांचा कार्यक्रम संपल्यावर प्रथम स्टेजवरची एक  मुलगी आपल्या मदतनीस ताईच्या मदतीने खाली उतरली आणि मग नंतर त्या मुलीचा हात धरून एकेक मुलगी अत्यंत सफाईने,हसत खेळत खाली उतरत गेली मी पुढे बसल्याकारणे त्या मुलींचं को-ऑर्डिनेशन मला इतकं जवळून बघायला मिळालं. बर स्टेजवरून खाली उतरल्यावरही त्या मुली त्याच चपळाईने रांगेत मागच्या बाकांवर जावून बसल्या. कुठेही गडबड,गोंधळ नाही, की धडपडणही नाही. ते सगळं बघून मी खूपच आश्चर्यचकित झाले. मला माझ्याच डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं. त्या मुलींचं आणि त्यांच्या शिक्षिकांचं  मनोबल,कसब अगदी वाखाणण्याजोगं होतं. सगळ्या मुली खाली उतरल्य़ा पण ती तबला वाजविणारी मुलगी मात्र स्टेजवरच बसून राहिली आणि याच कोडं मात्र मला उमगलं नाही. त्यानंतर सुरु झालं काव्यवाचन,तेव्हा मी “अमर डोळे” ही नेत्रदानावरची अनुवादित कविता म्हटली. माझे डोळे माझ्या मरणानंतर कुणा नेत्राहीनाना दान व्हावेत.” ही कविता ऐकल्यावर सगळेच निशब्द झाले. पण तिकडे आलेल्या अंध मुलींच्या पालकांच्या डोळ्यांत मला कृतज्ञता जाणवली. कवी संमेलनानंतर लगेचच दहावीच्या विद्यार्थिनींचा गुण गौरव समारंभ सुरु झाला, त्या शाळेचा रिझल्ट गेले कित्येक वर्षे १००%च लागत आहे. शाळेत पहिल्या आलेल्या मुलीला ८२% गुण मिळालेले होते. पालक,रीडर,रायटर आणि शिक्षिका यांच्या मदतीने अंध शाळेतील मुली प्रगतीचे नवे नवे दरवाजे उघडत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद होतं. समारंभास आलेल्या प्रमुख पाहुण्यानी तर या प्रसंगीत्या मुलींचे कौतुक करून त्यांना संस्थेचे पुरस्कार तर दिलेच पण प्रथम येणाऱ्या मुलीला दरवर्षी व्ययक्तिक पुरस्कार देण्याची घोषणा करुन त्या घोषणॆची लागलीच अंमलबजावणीही केली. हॉल मध्ये टाळ्यांचा गजर होत होता आणि साथीला तबल्याचे बोल आसमंतात घुमत होते. आणि मग मात्र ती तबल्यावरची थाप ऐकताच मला ते सुरुवातीला पडलेलं कोडं आता अलगद उलगडलं होतं. ती तबला वादक तिच्या परीने उपस्थितांच्या टाळ्यांना,आपल्या मैत्रिणींच्या कौतुकाला तबल्याच्या बोलाने दाद देत होती. तो तबल्याचा आणि टाळ्यांचा आवाज अंगांवर रोमांच उभा करीत होता. ते दृश्य बघून मन अगदी भरून आलं. घरी येतांना मी विचार करीत होते. ह्या मुली किती डोळसपणे यशस्वी जीवन जगतात आणि आपण मात्र …., पण आता मात्र मी ठरवलय की शक्य होईल तेव्हा या शाळेत यायचं,मुलींचे मनोरंजन करायचं आणि त्यांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद फुलवायचा…

आज 30 मार्च 2013. वेळ रात्री ९ वाजता.आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर “ऐसी अक्षरे रसिके” या कार्यक्रमांतर्गत प्रसारित होणार असलेला ललितबंध

—————————————————————————–

 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s