संमेलन समृद्धी – एक अनुभव.

 100_2408    

  संमेलन समृद्धी – एक अनुभव.
               देवनारला कोमसाप मुंबई जिल्हा आयोजित काव्योत्सव होता त्यावेळी कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ महेश केळुसकर यांनी १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाबद्दल एक घोषणा करण्यास सांगितली की,कोमसापचे आश्रयदाते,आधारस्तंभ मा. उदयदादा लाड यांनी दापोली येथील संमेलनाला जाण्यासाठी कोमसापच्या सदस्यांसाठी बसचे आयोजन केले आहे. संमेलनाचे प्रतिनिधी शुल्क फक्त रु.६०० आहे या प्रतिनिधी शुल्कात तिकडे ३ दिवस राहण्याचे,जेवण-चहा-नाष्टा याचा समावेश होता. ३१ ऑक्टोबर पर्यंत पैसे भरावे..जागा मर्यादित आहे…. मी तशी घोषणा केली आणि पटापट लोकांनी बुकिंग करण्यास सुरुवात केली ..खुद्द केळुसकर सरांनीच मला काही सदस्यांचे पैसे हातात दिले आणि केंद्रीय कार्यवाह प्रशांत परांजपे याच्याशी संपर्क करून ते पैसे बँक ऑफ इंडियाच्या संमेलनाच्या अकांउट मध्ये टाकण्यास सांगितले…
             मी प्रशांत सरांशी संपर्क साधला. त्यांनी मला तो अकांउट नंबर दिला. मी लगेच दुसऱ्या दिवशी जावून पैसे बँकेत भरले. नंतर  प्रशांत आणि केळुसकर सरांना मी बँकेत पैसे भरल्याचे कळविले.तर तो अकांउट नंबर माझ्या इतर तीन सहकाऱ्यांना कळविला.
बुकिंगला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळाला….पण माझे तीन सहकारी मात्र त्यांच्या त्यांच्या कार्यबाहुल्यात खूप व्यस्त असल्याकारणे त्यांनी थोडफार बुकिंग करून नंतर  ती बुकिंग करण्याची,बँकेत पैसे भरण्याची,बुकिंगचे डिटेल्स दापोलीला कळविण्याची,किंवा संमेलनाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक माहिती सांगण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. आणि आपल्या कोमसापच्या सदस्यांची गैरसोय होवू नये म्हणून ती सर्व  जबाबदारी मी माझ्या परीने पूर्ण करण्याचे ठरविले.पण याचा अर्थ हा नव्हता कि मी मला काही काम नव्हते.लकीली बँक माझ्या घराच्या जवळ होती आणि मला  कॉम्प्युटरची थोडी फार माहितीही होती आणि त्या माहितीचा उपयोग करायला आवडतही होतं आणि मह्त्वाच म्हणजे  एकदा का आपण  जबाबदारी घेतली तर ती शक्यतोवर पूर्ण करायला हवी अर्थात हे माझं मत आहे. आता गंमत म्हणजे बुकिंगसाठी चार नावं असूनही लोकही मलाच फोन करू लागले. अगदी प्रशांत सरही माझाच नंबर देवू लागले. सदस्यांनी पावती मागताच त्यांना मी सांगितले,एकतर आपल्याकडे पैसे भरल्याची पावती आहे.आणि दुसरे म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकतात. तेव्हा लक्षात आलं कि जबाबदारी बरोबर मला  त्या,त्या  व्यक्तीचा माझ्या कार्यावर असलेला  विश्वासही मिळाला आहे.  मग काय,डोक्यावर बर्फ ठेवून वा  जिभेवर खडीसाखर ठेवून रोज बुकिंगसाठी येणाऱ्या  फोनला उत्तर द्यायचे….पैसे आले की, बँकेत भरायचे आणि संबधित व्यक्तींना तसा sms/मेल  करायचा. खर तर मला असे काहीही करण्याची या आधी सवय नसल्याने वैताग यायचा पण ह्या प्रक्रियेत कॉर्डीनेशन खूप महत्वाचे होते.त्यामुळे मी आपल्यावरील जबाबदारीला महत्व दिले,मग मात्र काम सोप्पे होत गेले.
     बसचेही, रोज कुणी सदस्य येतो म्हणायचा  तर कुणी जमणार नाही म्हणायचे.या सगळ्या गोष्टींची नोंद वेळच्यावेळी प्रशांत सरांना/पाक्षिक निवेदिताला पाठविणे गरजेचे असायचे….
त्याच दरम्यान मी एकदा केळुसकर सरांना विचारलं, सर,मी माझ्यासाठी म्हणून नाही विचारत पण लोक मला विचारतात,की, संमेलनात काय काय  कार्यक्रम आहेत,संमेलनात  कोण कोण आहेत? त्यावेळी सर म्हणाले की तुम्हांला कवी कट्ट्याचे संयोजक करण्यात आले आहे. हे ऐकताच  मी एकदम ‘बापरे’ म्हणाले,आणि चक्क आश्चर्यचकित झाले. पण सर म्ह्णाले हे काम तुम्ही व्यवस्थित करू शकतात. तुम्ही  कवी संमेलन घेतात ना ? आता  यावर मला काय म्हणावे हेच समजेना. मग मी फक्त  मनात म्हटलं …जशी देवाची इच्छा !
       त्यानंतर एकदा मला केळुसकर सरांचा फोन आला,दूरदर्शनवर ‘लोकमानस’ या कार्यक्रमाला जा आणि ‘लोकमानस’च्या या  कार्यक्रमाच्या निर्माता,दिग्दर्शकाला अर्थात जयू भाटकर याला माझे पत्र, कार्यक्रम पत्रिका नेवून द्या आणि संमेलनाची एक  संयोजक म्हणून, कोमसापचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमास हजेरी लावा. बरोबर ९-१० प्रेक्षक घेवून जा. आणि  तुम्ही  त्या कार्यक्रमात आपल्या संमेलनाचे आमंत्रण द्या…. केळुसकर सरांनी दूरदर्शनवर कसे जायचे हे मला समजावून सांगितले. त्याप्रमाणे मी दूरदर्शनवर जयू  भाटकर यांना भेटले,त्यांना केळुसकर सरांचे पत्र दिले. पत्र वाचताच त्यांनी ‘महेशने पत्र चांगले लिहिले आहे.’ असे उद्गार काढले. मी माझ्या बरोबर येणाऱ्या १० प्रेक्षकांची नावे  आणि फोन नंबर तिकडे दिले.
‘लोकमानस’ हा कार्यक्रम लगेचच दुसऱ्याच दिवशी होता. त्याप्रमाणे त्यादिवशी आम्ही १० जण दुपारी चार वाजेपर्यंत दूरदर्शनमध्ये  पहिला  मजल्यावरील जयू भाटकर यांच्या ऑफिस मध्ये पोहचलो. आत पाऊल टाकले आणि बघते तर साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे मला बसलेल्या दिसल्या. ‘संमेलनाविषयी अपेक्षा’ असाच काहीसा तो कार्यक्रम होता. तसेच  तिकडे कोमसापच्या कार्याध्यक्ष नमिता कीर यांनाही  आलेल्या बघून मी आश्चर्यचकित झाले. कारण  केळुसकर सर तर मला म्हणाले होते कि आम्ही कोणी येणार नाही तुम्हीच बोलायचे,कार्यक्रमास जावून आमंत्रण करायचे मग आता काय करावं ? कारण कामाशिवाय उगाच  प्रेक्षकात जावून बसायला मला बिलकुल आवडलं नसतं. पण मग मी तसे विचारता  नमिता ताई  मला म्हणाल्या कि,’ जयू भाटकर यांनी खास महिला संमेलनाबद्दल बोलायला मला बोलावले आहे.’ म्हटलं, ठीक आहे.
    मुख्य वक्ते मेकअपसाठी गेले आणि आम्हीही आरश्यात पाहून सगळं ठिक आहे की  नाही  हे  बघितलं …नंतर  आम्हाला स्टुडिओमध्ये नेण्यात आले. आत बघितलं तर जयू भाटकर स्वत: जातीने प्रत्येकाला सूचना देत होते. एकाचवेळी चौफेर नव्हे तर अष्टदिशांना ते संयोजन करत आहेत असे मला वाटून गेले. तो एक जबरदस्त वेगळा अनुभव आहे. म्हणजे आपण स्टेजवर वाद्यवृंदाची मस्त सुरेल मैफल ऐकत असतो, पण ती सुरेल मैफिल बहुतांशी त्या संगीतकाराच्या मेहनतीचं फळ असतं .त्याच्या टीम वर्कची कमाल असते  हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. आपण टीव्हीवरचा  घरात बसून बघतो तो लाइव्ह  कार्यक्रम आणि स्टुडीओत प्रत्यक्ष बघितलेला लाइव्ह  कार्यक्रम यात जमीन आसमानचा फरक असतो हे मला त्यादिवशी चांगलेच प्रत्ययास आले. आता त्या कार्यक्रमाबद्दल किंवा जयू भाटकर सरांबद्दल बोलायचं तर त्यासाठी मला एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.असो,
मी त्या कार्यक्रमातून साहित्य रसिकांना १४ व्या कोमसा संमेलनाचे आमंत्रण देऊन केळुसकर सरांनी मला संमेलनातील कवी कट्ट्याची संयोजक म्हणून सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. म्हणजे सूत्रसंचालकाने मला प्रश्न एक विचारला आणि मी मात्र माझचं घोडं पुढे दामटून आले.अर्थात तो कार्यक्रम बघून नंतर बरेच जण,’आम्हांला संमेलनाचे आमंत्रण मिळाले बरं ‘ असे मला सांगत होते.एकंदरीतच  कोमसा संमेलनाची चांगली जाहिरात झाली होती.
    एकीकडे मा.उदय दादांनी बससाठी परवाना काढण्यासाठी प्रवास्यांची सविस्तर माहिती मागवली होती.तेव्हा परत एकदा बसमध्ये येणाऱ्या  प्रत्येकाशी संपर्क साधून योग्य ती माहिती मिळवली,ती त्यांच्याकडे पाठवली…..मग आमची बस संमेलनाच्या आधल्या रात्री १२ वाजता मुंबई- दादर येथून सुटेल हे कळाले…..मग काय बस रात्री निघणार म्हणून त्यातील अर्धे प्रवासी गळाले ..पण दुसरे प्रवासी क़्यु मध्ये होतेच.त्यामुळे काही Problem /प्रोब्लेम आला नाही ..मलाही माझ्या मैत्रिणीने तू आमच्या गाडीत येतेस का ? गाडीत जागा आहे…..अशी विचारणा केली..पण मी म्हंटले,मी गाडीचे बुकिंग केले आहे, लोकांनी माझ्यावर,कोमसापवर  विश्वास ठेवून हे बुकिंग केलय त्यांना अर्ध्यावर कसे सोडू? मी गाडीतच जाणार,गाडी घेवून जाणार आणि घेवून येणार. …..यावेळीही माझ्याबरोबर येणारे सहकारी त्यांच्या महत्वाच्या कामामुळे बरोबर येवू शकले नाही…पण कदाचित त्यामुळेच, मी काय करू शकते याची जाणीव मला झाली. 
       दि. सहा डिसेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत सर्व बस प्रवास्यांना राजाराम इस्टेट जवळ बोलावले. लोक आले, गाडी आली, गंमत म्हणजे वयोवृध्द व्यक्तींचे एक ठीक आहे पण गाडीत सगळ्यानाच पुढच्या सीटवर बसायचे होते. मध्येच एका मैत्रिणीसाठी मेडिकल शोधले. गाडीत बसल्यावरही  सगळे आलेत कि नाही हे बघण्यासाठी हजेरी घेतली. माझी condactor ची भूमिका संपली आणि आम्ही दादरवरून निघालो….मध्ये देवनारला गाडीत दोन जेष्ठ व्यक्तींना घ्यायचे होते. ड्रायव्हरला  ती जागा माहिती नव्हती मग क्लीनरची भूमिका करून त्याला देवनारचा stop दाखवला. तिकडचे प्रवासी  गाडीत चढले.आणि मग मात्र  मी माझ्या जागेवर जावून बसले. हसत खेळत प्रवास सुरु झाला …आणि केळुसकर सरांचा फोन आला कि जिकडे तुमची व्यवस्था केली तिकडचे लोक अजून रूम्स खाली करून गेले नाहीत तेव्हा तुम्ही सकाळी देवधर कार्यालयात जा आणि तिकडूनच सर्व आवरून संमेलन स्थळी या. मग या विषयावरही बसमध्ये उलट सुलट चर्चा झाली.
     मध्येच आमच्या बसचा दापोलीच रस्ता चुकला, आणि गाडीत प्रत्येकाची रस्ता सांगण्याची चढाओढ  लागली. इथून तिथून दापोलीला येवून पोहोचलो तर ते कार्यालय सापडेना…..गाडीत आठवड्याचा बाजार भरला कि काय असे वाटू लागले . प्रत्येक जण  आपापल्या परीने सजेशन देत होते. तेवढ्यात मला आठवले कि कालच गाडी सोडण्यासाठी आलेल्या एका माणसाने ड्रायव्हरला कार्यालयाचा डिटेल पत्ता लिहून दिला होता, ड्रायव्हरला म्हटलं,बाबा रे  तो पत्ता काढ आणि बघ,  मग तो पत्ता पाहताच आमच्या प्रवासाला एक दिशा मिळाली. आम्ही कार्यलायाजवळ आलो पण रस्ता अरुंद  असल्याकारणे बस कार्यालयाच्या दाराजवळ जावू शकत नव्हती. सगळे वैतागत कार्यलयात शिरले आणि तिकडील २ बाथरूम आणि दोन संडास पाहून आता एवढ्या कमी वेळात  सगळ्यांचे कसे आवरून होणार आणि दिंडीला कसे जायला मिळणार यावरून चिडचिड सुरु झाली. मला तर माझेच नवल वाटू लागले कि मी इतकी  शांत कशी काय आहे? मी सगळ्यांचे सगळं ऐकत होतेच. पटकन निवास व्यवस्था करणाऱ्या मिलिंद जोशी यांच्यांशी संपर्क केला त्यांनी नाईलाज व्यक्त केला पण मग मी एक सुवर्ण मध्य काढला,म्हटले कि आम्ही बस घेवून तिकडे येतो जेवढ्या रूम्स रिकाम्या असतील तेवढ्या ताब्यात द्या बाकी मी सांभाळून घेते.आम्ही बायका एकत्र राहतो,पुरुष एकत्र राहतील निदान डोळ्याने परिस्थिती बघून प्रत्येकाला थोडे तरी आपण आपल्या रूमवर आल्याचे समाधान तरी वाटेल. माझा हा अंदाज खरा ठरला. खर तर आवर्जून मला इथे हे सांगायला खूप अभिमान, आनंद वाटतो कि,बसच्या प्रत्येक प्रवास्याने माझ्या निर्णयाला साथ दिली,माझ्यावर विश्वास दाखवला.आणि त्यामुळेच आमचा पूर्ण प्रवास व्यवस्थित पार पडला. आता किसान भवनच्या रूम्स/बाथरूम्स अस्वछ बघून परत सगळ्यांचा  मूड गेला पण मात्र त्याही परिस्थितीत प्रत्येकजणाने दिंडीला नाही जाता आले तरी उद्घाटन सोहळ्याला तरी वेळेवर हजर राहता यावे हेच प्रयत्न केले.मी थोडासा सुटकेचा श्वास टाकला.
   दि.७ डिसेंबरला साहित्य संमेलनाची शानदार सुरुवात झाली … एकीकडे मला  दुसऱ्या दिवशीच्या कवी कट्ट्याची व्यवस्था करायची होती….त्यावेळी अजित कांबळे हे समन्वयक मदतीला आले…..त्याच्याबरोबर मनिष पाटील,अजितकुमार जंगम आणि  मी असे सर्वांनी मिळून दुसऱ्या  दिवशीच्या काव्यहोत्राची तयारी केली .सकाळी ९ वाजता बरोबर ग्रंथ प्रांगणात हजर होवून आम्ही कवी कट्ट्यासाठी नाव लिहून घेवू लागलो….कवी कट्ट्याची सुरुवात अतिशय झोकात झाली म्हणजे संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर,नामिताताई,सौमित्र,अशोक पत्की,नलेश पाटील,शशिकांत तिरोडकर अश्या दिग्गजांनी तिकडे हजेरी लावली अनौपचारिक गप्पा झाल्या. त्या ऐकून वाटलं कि संमेलनात रोज एक तास तरी वाचक -लेखक यांच्या गप्पा-टप्पा व्हायला हव्यात.विचारांचे आदानप्रदान व्हायला हवे, साहित्य-समृद्धी वाढायला हवी.  त्या वेळी कवी कट्ट्याचे अध्यक्ष म्हणून नायगावकर सरांनी कवींना मार्गदर्शन केले की,प्रत्येक कला मिळविण्यासाठी, शिकण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. गुरूंनी परवानगी दिल्याशिवाय तुम्हांला आरंगनेत्रमही  करता येत नाही परंतु साहित्याचे तसे नाही. इकडे  तुम्हीच तुमचे गुरु व्हायचे असते. मन:पूर्वक साहित्य साधना करायची असते. नंतर कवी कट्ट्यात दर तासाला श्रोत्यांनी  मतदान  करून एक कवी/कवयित्री विजेता घोषित करायचा होता.आणि पुरस्कार विजेत्याला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे सृष्टी आणि दृष्टी हे पुस्तक भेट म्हणून मिळणार होतं. कवींना अशा  प्राथमिक सूचना देवून कवी कट्टा  सुरु करण्यात आला,खर तर मुख्य मंडपात खूप छान छान कार्यक्रम चालू होते, पण हातात कवी कट्ट्याची जबाबदारी होती ती व्यवस्थित पूर्ण करायची होती.
    एकीकडे  सूर्य डोक्यावर तळपत होता,मंडपात खूप गरम होत होतं,पंख्यांची संख्या कमी होती….पण तरीही कवी कट्टा अखंड सुरु होता,कवी होत्र चालू होतं. माझी मैत्रीण संगीतानेही मला कवी कट्ट्यावर थोडी मदत केली.ती मला म्हणाली ,तू थोडी थंड हवा खावून ये मी थांबते इथे. पण अस करणं मला रुजलं नाही.ते मला माझ्या तत्वाच्या विरुध्द वाटलं. म्हणजे खरतर मला फारसं गरम झालं नाही कारण डोक्यात फक्त कार्यक्रम व्यवस्थित पार पडायला हवा हेच होतं. 
  दर तासाला एक असे सात विजेते आम्ही घोषित केले गेले. आणि आम्ही कवी कट्ट्याचे संयोजक बाकी कार्यक्रम पाहण्यास,ऐकण्यास मोकळे झालो, मग मात्र पुढचे कार्यक्रम मन लावून पाहता आले.   kattaशेवटी  बरेचजणांनी माझे कौतुक केले. सरोजताई  जोशी यांनी तर मला हा अनुभव लिहून काढायला सांगितला. म्हणून मी माझ्या अनुभवला शब्दरूप देण्याचे धाडस केले.
    दुसऱ्या दिवशी दि.९ डिसेंबरला संमेलनाचा समारोप झाला. संमेलन यशस्वीपणे पार पडले. प्रशांत परांजपे आणि त्यांच्या दापोलीकरांनी यजमानपद चांगलेच  निभावून नेले.
  एकीकडे बसचे प्रवासी आपापल्या सोयीनुसार मुंबईला परतत होते. तर कुणी  तुमच्या बसमध्ये जागा आहे का? अशी विचारणा करत होते. शिवाय परतीचा प्रवासाची वेळेबाबतही दादर आणि बदलापूर या प्रवासी मंडळींमध्ये दुमत होतं परत मग आम्ही सर्वांनी  पूर्ण विचारांती सर्वांची सोय विचारात घेवून रात्री १० वाजता दापोलीवरुन निघायचे ठरविले. आणि दहा तारखेला पहाटे चार वाजता गाडी दादरला येवून पोहचली. सगळ्यांनी पटापट एकमेकांचा निरोप घेतला आणि प्रत्येकजण आपापल्या घराच्या दिशेने निघाला.
मीही माझ्या घराच्या दिशेने निघाले,पण मनात संमेलन संपल्याची एक हुरहूर होती, तर कुठेतरी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपल्याला व्यवस्थित पार पाडता आली याचे समाधान ही होते.
    खरतर असे संमेलन, अशी जबाबदारी मी पहिल्यांदाच पार पडत होते त्यामुळे मला टेन्शन होते कि हे सर्व ठीक ठाक पार पडेल ना?  गौरीताई कुलकर्णी हिने माझ्यावरील अपार विश्वासाने मला वांद्रे शाखेची अध्यक्ष केल होत. तिच्या मार्गदर्शनामुळे, प्रोत्साहनामुळे, तर केळुसकर सरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे,नामिताताई कीर यांच्या सहकार्यामुळे मी ही  जबाबदारी माझ्यापरीने प्रामाणिकतेने  पार पाडण्याचा प्रयत्न केला होता…अर्थात काही कमी काही जास्त असे अनुभव आले,पण एकंदरीतच  हा संमेलनाचा अनुभव घेवून मन समृध्द झालं.
      मला वाटतं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीला एखादी जबाबदारी पार पडण्याचे बळ  कुठून येत असतं?  तर जेव्हा ती व्यक्ती,तो माणूस आपल्या संस्थेसाठी काम करतो. कारण माणसापेक्षा संस्था मोठी आहे.आपल्या सर्वांचे आदरस्थान,तीर्थस्थान  मधुभाई यांनी ह्या संस्थेचे बावीस वर्षापूर्वी  लावलेले रोपटे आज विशाल वटवृक्ष झाला आहे. कोमसाप सदस्यांसाठी हे एक कुटुंब  आहे. आणि आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या सन्मानासाठी तर व्यक्ती,माणूस नक्कीच मनापासून काम करेल हो न? असो,आपली कोमसाप ही संस्था चिरायू होवो…(  झपूर्झा जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०१३ )
————————————————————————————————————————————

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s