मनस्वी नागराज

Imageधन्यवाद “संजय आवटे” सर….आपण आपल्या “कृषीवल” च्या ‘कलासक्त’ पुरवणीत  आमच्या कोमसाप वांद्रे शाखेतर्फे घेण्यात आलेल्या दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीला आवर्जून स्थान दिले,त्याला इतके चांगले कव्हरेज दिले त्याबद्दल आपले आणि आपल्या संपूर्ण  टीमचे मन:पूर्वक आभार!!

आणि तसेच ”नागराज मंजुळे” आपलेही मन:पूर्वक आभार!!

ImageImage

कोकण मराठी साहित्य परिषद,वांद्रे शाखा आणि सोमवार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिध्द कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे (राष्ट्रीय पुरस्कार विजेते ) यांची प्रकट मुलाखत दिनांक २२ एप्रिल रोजी लेखिका गौरी कुलकर्णी आणि ज्योती कपिले यांनी घेतली त्याचा हा सविस्तर लेख                                                                                                                                         “मनस्वी  नागराज”

गौरी कुलकर्णी :- आपल्या लिखाणाला घरच्यांचा कसा पाठिंबा होता. आणि त्यातून आपली कविता कशी फुलत गेली ?

-खरतर मला डायरी लिहिण्याची सवय होती. सुरवातीला रोज डिटेल्स मध्ये लिहित होतो पण हळहळू तेच तेच लिहिण्याचा मला कंटाळा आला. मग मात्र काही विशेष घडलं,वाटलं किंवा मनाची अस्वस्थता वाढली की मी डायरीत लिहू लागलो. मला पडलेल्या प्रश्नांना,मी डायरीतूनच उत्तर शोधू लागलो. माझ्या लिहिण्याला घरच्यांचा पाठिंबा असा नव्हता. त्यांना वाटायचं असं लिहून काय होणार? आई विचारायची की तू कविता लिहितो तर तुला पैसे किती मिळतात? कारण तिला सर्व साधारण आईला असते तशीच भविष्यात तिच्या मुलाचं पोट भरावं अशी काळजी असायची.

कॉलेजमध्ये असतांना मी दिवसभर लायब्ररीत पुस्तक वाचत बसायचो. आजही मी वाचतो, वाचल्याशिवाय मला करमत नाही. कवी पुरुषोत्तम पाटील यांची ‘पाहुणेर’ ही कविता मला खूपच आवडली होती. मी त्या प्रभावाखाली तशीच दुसरी कविता लिहून काढली. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की अनुकरणापेक्षा स्वत:चं काही अस्सल लिहावं. केशवसुत, मर्ढेकर, कुसुमाग्रज,अरूण कोल्हटकर हे माझे आवडते कवी आहेत.

असचं एका काव्य संमेलनात मी कविता सादर केली त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कवी दत्ता हलसगीकर यांनी सूत्र संचालकाकडून माईक घेवून माझ्या कवितेचं कौतुक केलं. तसेच प्रा. नागनाथ कोतापल्ले यांचे मार्गदर्शन लाभलं. माझ्या कविता मौज,कवितारती अशा मासिकात प्रसिध्द होऊ लागल्या. मनाला उभारी येऊ लागली. माझे वडील तसे सही करण्यापुरतेच पुरे शिकलेले. थोडं फार ते वाचू शकत. आई मला ओरडली की म्हणत बघ तरी त्याच्या नावाबरोबर किती मोठमोठे नावं लिहिली आहेत. त्यांच्या बरोबरीने आपल्या मुलाचं नाव मासिकात आलयं. आणि मग माझी कविता आलेलं मासिक घेवून ते माझ्या प्राचार्याकडे जात त्यांच्याकडून वाचून घेत, असं ते बऱ्याच लोकांकडून माझी कविता वाचून,समजावून घेण्याचा प्रयत्न करत असत.

माझी एक कविता आहे “माझ्या हाती नसती लेखणी …तर…तर असती छिनी..सतार …बासरी अथवा कुंचला..मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला “मला व्यक्त व्हायचं होतं,व्यक्त होणं माझी गरज होती. “माझ्या जगण्या-मरण्याला नसतो कवितेविना अन्य पर्याय”  आणि मग मी माझ्यापरीने माझ्या मनातला कोलाहल बाहेर काढत गेलो.

ज्योती कपिले :- कविता लिहिता लिहिता लघुपट वा सिनेमाकडे कसे वळलात?

मी एम.ए. मराठी केलं. नंतर एम फिल करत असता,त्याच वर्षी कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन्सचा वर्ग सुरु झाले. त्यावेळी मला समजले की हा कोर्स केला तर सिनेमा बनवता येतो,मग मी तिकडे addmission घेतली. त्यावेळी माझ्या मित्रांनी मला उमेश कुलकर्णी यांचा ‘गिरणी’ हा लघुपट दाखवला. तसा लघुपट मी पहिल्यांदाच बघत होतो. मग माझ्या लक्षात आलं की सिनेमा पूर्ण लांबीचाच बनवला पाहिजे असं नाही तर अशा लघुपटाद्वारे आपल्याला 15 मिनिटात बरच काही सांगता येतं, मांडता येतं मग मात्र मी ‘पिस्तुल्या’ बनवला.

तशी लहानपणापासून मला सिनेमा बघायची खूप आवड. अमिताभ, मिथून, जितेंद्र यांचे सर्वच सिनेमे मी बघीतलेले आहेत. शाळेला दांडी मारून मी सिनेमाला जायचो. त्यावेळी शोले मी दोनदा बघितला होता. गावच्या माळरानावर आम्ही शोले प्रत्यक्ष साकारायचो, त्यातील डॉयलॉग बोलायचो, गाढवाच्या पाठीवर बसून फिरायचो.खूप धमाल करायचो, गोष्टीं ऐकण्याची,सांगण्याची मला लहानपणापासूनच आवड होती. तसा कॉलेजला असताना नाटक,एकांकिका करायचो, लिहायचो. पण सिनेमा बघतांना,काही दृश्य बघतांना, त्यातील प्रणय बघतांना वाटायचं अरे हे असं प्रत्यक्ष तर नसतं किंवा एखादा शेतकरी अगदी स्वच्छ कपडे घालून शेत नांगरण्याचे वा खुरपण्याचे काम करत आहे आणि मी जे जीवन बघतोय, अनुभवतोय यात तर कुठेही असं काहीच नाही, मग मात्र तेव्हा डोक्यात यायचं की मी जर सिनेमा बनवला तर असा बनवणार नाही. म्हणजे मला मी काय करणार नाही हे माहित होतं. आणि सिनेमा माझ्यात असा खोलवर खूप रुजला होता,मुरला होता. त्यामुळेच असेल कदाचित सिनेमा बनविण्याची वेळ आल्यावर मला खऱ्याखुऱ्या जगण्याचा सिनेमा बनवावासा वाटला.

गौरी कुलकर्णी :- दिग्दर्शनाकडे कसे वळलात?

खरंतर मला “विद्येविना मती गेली |मतीविना नीति गेली |नीतीविना गती गेली |गतीविना वित्त गेले |वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले” असे सांगत सगळ्यांचा विरोध पत्करून आपल्या भगीरथ प्रयत्नाने तळागाळातील समाजात शिक्षणाची गंगा पोचवणारे महात्मा ज्योतीराव फुले यांचे साहित्य मला खूप आवडतं,त्या साहित्याने मला जगण्याची प्रेरणा मिळाली. ‘पिस्तुल्या’ बनविण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या लघुपटातील ‘पिस्तुल्या’लाही घरात पोषक वातावरण नसलं तरीही शिकण्याची प्रबळ इच्छा असते. ती मला कुठेतरी व्यक्त करायची होती. आजपर्यंत माझ्याकडे मला व्यक्त होण्यासाठी कवितेचं माध्यम होतं आणि आता मला लोकांपर्यंत पोहचण्याचं दुसरं एक तेवढच सशक्त माध्यम मिळालं. त्याचा मी उपयोग करून घेतला

माझ्या कथेला कोण कसा न्याय देईल या विचारामुळे मीच या लघुपटाचा स्क्रिप्ट रायटर,निर्माता आणि दिग्दर्शक झालो. माझ्या भावाने,मित्रांनी मला मदत केली. मला पाहिजे होता तसा लघुपट मी बनवला. आता तो कोणाला आवडला,कोणाला नाहीही…पण मी मात्र माझा सिनेमा निरनिराळ्या फेस्टिवलमध्ये पाठवू लागलो, सुरुवातीला त्याला पुरस्कार मिळेल असं वाटत असतांनाही एकही पुरस्कार मिळाला नाही … मग मी अगदी ‘पिस्तुल्या’ राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठवला हे पण विसरून गेलो. मी गावी जात असता मला ट्रेनमध्ये फोन आला कि पिस्तुल्याला ५८ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. एकूण या लघुपटाने वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्ये चौदा पुरस्कार पटकावले आहेत.

दिल्ली येथे “पिस्तुल्या’च्या प्रदर्शनानेच राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरवात झाली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते दिल्लीला मी रजतकमल पुरस्कार स्वीकारला. तसेच या लघुपटातील बालकलाकार सूरज पवार याचाही राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

ज्योती कपिले :- पुरस्काराने तुमच्या जीवनात नेमके काय बदल झाले?

त्यावेळी गावाने माझं अगदी जंगी स्वागत केलं, सगळ्यांच्या माझ्याकडे आणि ‘पिस्तुल्या’ या लघुपटाकडे बघण्याच्या नजरा बदलून गेल्या. पिस्तुल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर यशाचे मायने बदलले ,छोटे- मोठे बदल झाले ते साहजिक आहे. पण मी नाही बदललो. आणि बदलणारही नाही. मात्र पुरस्कारामुळे तुमच्या कामाची विशेष नोंद होते.त्याने पुढे काम करायला अजून उत्साह येतो. आपला track योग्य आहे याला पुष्टी मिळते हे मात्र नक्की.

गौरी कुलकर्णी :- तुम्हांला मिळालेल्या यशाला मेहनतीची जोड आहेच,पण त्याला नशिबाचीही जोड आहे का?

माझा नशिबावर अजिबात विश्वास नाही. नशिब नावाची गोष्ट मला शिवी वाटते. यश हे तुमच्या प्रयत्नावर आणि ते प्रयत्न तुम्ही किती मनापासुन करता त्यावर अवलंबून असतं. जर यशात नशिबाला मान्य केल तर मग लोक प्रयत्नापेक्षा नशिबावरच जास्त अवलंबून राहतील. नशिबाच्याच मागे लागतील. त्यांचा स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास राहणार नाही आणि हे मला मान्य नाही. चांगली कामं ही कधीतरी लोकांसमोर येतातच. तेव्हा उगाचच यश हे नशिबाचा भाग म्हणून मान्य करणे मला अजिबात मान्य नाही

गौरी कुलकर्णी :- ‘फॅंड्री’ या सिनेमाचा गाभा, वेगळेपण काय?

आता  ‘फॅंड्री’ सिनेमा म्हणजे ग्रामीण भागातील एक प्रेमकथा आहे. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा संघर्ष त्यात रेखाटण्यात आला आहे. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं. जे त्याला वाटतं की, हे आपल्या आवाक्यात नाही. तरी ते स्वप्न त्याला पूर्ण करायचं असतं. कथेला ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी ती एक हळूवार सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी अशी प्रेमकथा आहे.

खरंतर ‘फॅंड्री’ या सिनेमाच्या टायटलबद्दल मी आता काहीच सांगणार नाही. पण हे टायटल फिल्मशी अत्यंत निगडीत आहे. कथानकाशी एकजीव असं आहे. जेव्हा तुम्ही हा  सिनेमा बघतील तेव्हा तुम्हांला त्याचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे कळेल, आणि मग तुम्हीच मला या शब्दाचा तुम्हांला उमगलेला अर्थ सांगाल असं मला वाटतं.

ज्योती कपिले :- ‘फॅड्री’ च्या टीझरला (ट्रेलरला) यु ट्यूब वर खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि हा सिनेमा बराच चर्चेत आहे.त्याबद्दल काही सांगा…

नुकताच आम्ही ‘फॅड्री’चा टीझर यु ट्यूब आणि फेसबुक वर रिलीज केला त्याला अगदी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन मिडियात एखादं चांगलं काम अगदी सहजरीत्या काही एक मोबदला न घेता लोकांपर्यंत पोचवता येतं. फेसबुकसारख्या साईटवरून तुम्ही लाखों लोकांपर्यंत पोहचू शकता. आज गावागावात फेसबुक चालतं. घराघरात कम्प्युटर आलं आहे, नेट आलं आहे. त्यामुळे ऑनलाईन मिडियाचा हा फायदा आपण प्रत्येकाने करून घ्यायला हवा असं मला वाटतं.

निलेश नवलखा आणि विवेक कजरिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत. त्यांना रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये बोलवण्यात आलं. एशियातून फक्त चार निर्मात्यांना या फेस्टीव्हलमध्ये बोलवण्यात आले असून ‘फॅड्री’चे प्रोड्युसर म्हणून या दोघांना बोलवण्यात आले. सिनेमा रिलिज व्हायच्या आधीच हे यश बघून मला अर्थातच खूप आनंद होत आहे .

बुद्धदेवदास गुप्तांनी ही फिल्म पाहिली आणि त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘अशी फिल्म आजपर्यंत भारतीय भाषेतच आली नाही’. तर श्याम बेनेगल म्हणाले की, ‘This is very powerfull Film’….या दिग्गजांकडून मिळालेल्या ह्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. हा माझ्यासाठी एक पुरस्कारच आहे.

गौरी कुलकर्णी :- हळूहळू अनुभवातून तुम्ही काय शिकलात?

मी फक्त हाती आलेलं काम चांगलं कसं करता येईल याकडे जास्त लक्ष देतो. शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला आता  ह्या फिल्मलाही मिळायला हवा. असे विचारही करत नाही. फक्त मनापासून काम करतो.

माझ्याकडे खूप वेगवेगळ्या कथा आहेत ज्या कधी प्रेक्षकांनी वाचल्याही नसतील आणि बघितल्याही नसतील. जर एखादी ऎकलीही असेल तरी ती वेगळ्या दॄष्टीकोनातून तुम्हांला नक्कीच बघायला मिळेल आणि तुम्हांला ती आवडेल ही माझी खात्री आहे.

शेवटी सर्वाच्या वतीने नागराज मंजुळे यांना शुभेच्छा देत

“नागराज मंजुळे अक्षरे फक्त सात

त्याच्या कर्तुत्वाचे लागो,उंच आभाळाला हात”

अशा ओळीतून गौरी कुलकर्णी यांनी मुलाखतीचा समारोप केला.

शब्दांकन :- ज्योती कपिले

Advertisements

One response to “मनस्वी नागराज

  1. मला ही मुलाखत खुप आवडली, खुप काही शिकायला भेटलं, माझी चित्रपट बनवन्याची इछ्या प्रबळ झाली
    Thankyou नागराज सर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s