माझा वॉक…कुसुमाकर मासिकाच्या ‘मनभावन’ ह्या माझ्या सदरातील सहावा लेख

 माझा वॉक…

    दर महिन्याला माझा बारीक होण्यासाठी वॉकला जाण्याचा एकदा तरी संकल्प होतोच. आणि मग सकाळी लवकर उठून माझी रोजची कामं आटपून आमच्या बांद्र्याची शान असलेल्या ‘Bandstand’ या समुद्र किनाऱ्यावर जाण्याची माझी तयारी सुरु होते. तसं ‘Bandstand’ ला जायचं म्हटलं की दोन सिग्नल,दोन शाळा,शाळेला जाणाऱ्या मुलांची, आणि त्यांच्या पालकांची लगबग,रिक्षा,बसेसची गर्दी हा सगळा अडथळा पार करतांना माझा जीव अगदी मेटाकुटीला येतो पण मग दर्शन होतं ते अथांग पसरलेल्या रत्नाकराचं आणि ती गार,प्रसन्न,स्वच्छ हवा अंगावर घेताच मन कसं हरखून जातं. तो क्षितिजापार पसरलेला समुद्र मी डोळ्यात साठवून घेत राहते. तर दूरवर ठिपक्याएवढ्या दिसणाऱ्या मासेमारांच्या बोटी,जहाजं,दीपस्तंभ हे सगळं बघत असतांना मन तिथेच गुंतून राहू पाहतं. कधी नेहमीच्या रस्त्यावर चालू असते ती एखाद्या सिनेमाच्या किंवा सिरीयलच्या शुटींगची गडबड,मग त्यामुळे त्या रस्त्याऐवजी दुसऱ्या पायवाटेने जाण्याचा वैताग येतो पण तरीही तिकडे कोण कोण शुटींग करतंय याची दखल घेण्यासाठी मान वळवून वळवून बघतांना त्यादिवशीपुरता मानेचा व्यायाम केला नाही तरी चालुन जातं. मधेच एखाद्या तानसेनाचा  रियाज करतांनाचा सूर  कानी  पडतो तेव्हा माझ्या मनाला आलेली मरगळ पटकन पळून जाते. आणि आपोआपच त्या सुरांबरोबर मीही गुणगुणत पुढे जावू लागते. तिकडे असलेल्या बागेत हिरवळीवर शांततेत योगाचे क्लास चालू असतात.एकीकडे मात्र कुत्र्याला फिरायला घेवून येणाऱ्यांची ओढाताण पाहून कुत्रा मालकाला घेवून पळतोय का मालक कुत्र्याला घेवून पळतोय हे बघून हसू आल्याशिवाय राहवत नाही. मात्र तरीही ह्या गडबडीत कुणाचा निवांत अभ्यास,कुणाचं पेपर वाचन,कुणाचं हवा खाणं अगदी तब्येतीत चालू असतं. आणि नेमकं अश्यावेळी ‘Bandstand’ वर उघड्यावर एकमेकांना  नको तितकी चिटकून बसलेली जोडपी पाहून फिरण्याच्या मुडच जातो. खरतर पोलिस तर त्यांना नेहेमीच हटकतात पण दोन दिवसात त्यांचे पहिले पाढे पंचावन्न होतात.

एके दिवशी मी वॉक करतांना दुरून मला एक शाळकरी मुलगा आणि मुलगी सकाळीच शाळेचे दप्तर घेवून बेंचवर बसलेले मला दिसायचे. बहुधा शाळा बुडवून ते दोघं तिकडे येत असावीत. एकदा माझ्या मनात विचार आला की,ह्या मुलांच्या जवळ जाऊन निदान एकदा तरी आपुलकीने सांगावं….बाळांनो…तुम्ही  जे करत आहेत ते चुकीचं आहे अस्म सांगून जबाबदार नागरीकाचं कर्तव्य पार पाडायला हवं. मग त्यांच्याशी बोलण्यासाठी मी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव त्यांच्याकडे निघाले इतक्यात भिकाऱ्यांच्या लहान मुलांच्या टोळीने त्या दोघांना….’कुछ पैसा दो ना’ असं म्हणत अगदी हैराण करून टाकलं होतं आणि मी तिकडे पोहचण्याच्या आधीच ती शाळकरी मुलं तिकडून निघून गेली होती. तेव्हा वाटलं ह्या अश्या लहानग्या मुलामुलींना इकडून उठविण्यासाठी काहींना खास ट्रेन करूनच ठेवायलाच हवं, नाही कां?

मात्र हे सगळं बघून एकदा वर्तमानपत्रात वाचलेलं आठवलं की, Bandstand च्या खडकांवर बसलेलं एक जोडपं एकमेकात इतकं हरवून गेल होतं की त्यांच्या सभोवताली कधी भरतीचे पाणी भरलं, हे त्यांना कळलंच नाही. जेव्हा जीवावर बेतलं तेव्हा ते भानावर आले मग सुरु झाला त्यांचा आरडा ओरडा, मग पोलीस आले,अग्निशामक दल आलं आणि मग कुठे म्हणे त्या दोघांची सुटका झाली. नंतर पोलीस तपासात हे सत्य समोर आलं कि, मुंबईतील काडेपेटीच्या आकाराच्या घरात एकत्र कुटुंबात राहणारे ते दोघे खरोखरीचे नवराबायको होते आणि मनाचा कोंडमारा दूर करण्यासाठी ती अशी आठ दिवसातून एकदा इकडे भेटत होती…

            माझं वॉक आणि विचार करणं चालू होतच. तेवढ्यात समोर खडकांच्या जवळ एक काही वेगळ्याच रंगबेरंगी फुलांचं झाड दिसलं.आता हे कुठलं झाड बुवा, असा विचार करत मी त्या झाडाच्या जवळ जाऊन बघते तर काय, त्या हिरव्या झुडूपांवर समुद्राच्या पोटातील अनावश्यक वस्तूंचे म्हणजे कचऱ्यांचे,प्लास्टिकचे तुकडे बहुधा भरतीच्या वेळी येवून चिकटून बसलेले दिसत होते. आणि दुरून ते रंगबेरंगी फुलांसारखे दिसत होते. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास बघून माझं मन विषण्ण झालं, कळत नकळत आपल्या हातून होणाऱ्या ह्या चुका आपल्याला किती महाग पडणार आहेत आणि हे आपल्या कधी लक्षात येणार आहे कुणास ठाऊक?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s