‘ धडा ‘ कुसुमाकर मासिकातील मनभावन या सदरातील सातवा लेख

kusumakarmasik

             आपण आपलं आयुष्य खूप सहजतेने घेतो, ‘ सब चलता है ‘ असं म्हणत पुढे जातो. आता  कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा कुठलेही नियम तोडणे हे वाईटच! पण आपण मात्र इतक्या सहजतेने नियम तोडत पुढे जात असतो की, आपल्याला लक्षातच येत नाही कि आपण काय करत आहोत ते. आणि जेव्हा आपल्याला आपली ही चूक लक्षात येते तेव्हा कधी आपल्याला ही चूक सुधारायची संधी मिळते तर कधी नाही. पण जगलो-वाचलो तर मात्र हा प्रश्न उरतोच की, ह्या घटनेतून आपण काय शिकलो? आणि काही शिकण्यासाठी आपल्याला काही गमवावंच लागतं का? त्याशिवाय आपल्याला काही ‘धडा ‘ मिळू शकत नाही का?                                                                            काही वर्षांपूर्वी माझे मेहुणे,विकास यांची पुण्याला बाय-पास सर्जरी करायची निश्चित झाल्यावर मला नासिकवरून पुण्याला जायचं होतं. विकासचा मित्र हेमंतही पुण्याला येणार होता. तो आणि त्याची बायको नीता … दोघंच त्यांच्या गाडीने प्रवास करणार होती. त्यामुळे विकासच्या गाडीत गर्दी नको म्हणून मी आणि माझी नणंद हेमंतच्या गाडीने पुण्याला निघालो. वरकरणी गाडीत गप्पा चालू होत्या पण सगळ्यांनाच एक अनामिक हुरहूर लागल्यामुळे प्रत्येकाचं मन अस्वस्थच होतं. विकासला रस्त्यात काही मदत लागली तर आपण जवळ असावं या विचाराने हेमंतने विकासच्या गाडीमागे गाडी ठेवली होती. पण अचानक विकासची गाडी पटकन पुढे निघून गेली. आणि त्यामुळे हेमंतने आपली गाडी जोरात पळवायला सुरुवात केली. मित्राच्या तब्येतीचे हेमंतला खूप टेन्शन होतं. त्यातच आमची गाडी चंदनपुरी घाट चढू लागली. घाट चढत असतांना जरा ट्रॅफिक लागल्यामुळे आणि विरुध्द बाजूने कोणतीही गाडी येत नसल्यामुळे  हेमंतने आपण गाडी त्या साईडने काढावी असा विचार केला आणि तो रस्त्याच्या विरुद्ध बाजूने पुढे जावू लागला. आमची गाडी उजव्या वळणावर वळणार तेवढ्यात समोरचे दृष्य बघून आमचे सर्वांचे डोळे विस्फारले गेले. समोरून एक भलामोठा ट्रेलर येतांना आम्हांला दिसला. एक भलीमोठ्ठी गाडी समोरून येतेय आणि आमची गाडी बाजू घ्यायला जागा नाही,काय करावं या विचाराने आम्ही सगळेच गर्भगळीत झालो. वाटलं, आता आपण ट्रेलरला धडकणार. म्हणजे सगळं संपलंच की. इकडे हेमंतने आणि ट्रेलरच्या ड्रायव्हरने आपापल्या गाड्या कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही टक्कर झाली ती झालीच. गाडीच्या उजव्या साईडला जोरात धक्का बसला आणि खूप ठोकली गेली. माझ्या हातातला फोन खाली पडला आणि तोंडातून ‘गजानन बाबा’ असे शब्द निघाले. पण दुसऱ्या मिनिटाला बघते तर काय अहो आश्चर्य! आम्ही जिवंत होतो. अगदी  ट्रेलरला धडकुनही आम्ही जिवंत होतो. पण सगळे प्रचंड घाबरलेलो होतो. त्या शॉकमधून बाहेर आल्यावर आम्ही कोणाला काय दुखापत झाली हे बघू लागलो. गाडीच्या पुढच्या काचा एकदम तडकल्या होत्या पण नशीब त्या फुटल्या नव्हत्या किंवा हेमंतला लागल्याही नव्हत्या पण त्याला मुका मार बसला होता. त्याच्या मागच्या बाजूला मी बसले होते आणि माझ्या बाजुनेच गाडीला जोरात हिसका बसल्यामुळे माझाही हात थोडा दुखावला गेला होता. माझ्या नंणदेनेही समोर ट्रेलर बघून आता आपले काहीच खरं नाही अस वाटून पण त्यातल्या त्यात थोडी सावधानता म्हणून पुढच्या सीटला पक्क धरून ठेवलं  होतं. तिलाही आपल्याला मुका मार लागलाय हे जाणवलं. मात्र नीताला काहीच लागलं नव्हतं. ट्रेलरचा ड्रायव्हर हेमंतला शिव्या देत होता. आजूबाजूचे लोकही घाटाच्या वळणावर तुम्ही चुकीच्या बाजूने कसे जातात असं आम्हांला ओरडू लागले. पण एकीकडे ते आश्चर्यही व्यक्त करू लागले की,एवढा मोठा अपघात होऊनही तुम्ही सहीसलामत आहात. हो, नाहीतर एखादी कार ट्रेलरवर धडकली की त्या कारचा आणि त्यातल्या लोकांचाही चुरा होणार हे ठरलेलेच असतं. पण केवळ आम्हा चौघांचेही दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो! हेमंत तर काहीएक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फक्त मला माफ करा  असं बोलून गाडी बाजू घेतली. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तेव्हा मग लक्षात आलं की, का आम्ही कुणी हेमंतला तो रॉंग साईडने गाडी चालवतो म्हणून ओरडलो नाही? का आम्ही चूप बसलो? गाडी चालविण्याची घाई करू नको असं त्याला का नाही म्हणालो? किंवा त्याच्याही ते का लक्षात नाही आले? आता ती बोलण्याची वेळ तर निघून गेली होती. पण काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. खरतर विकासच्या काळजीमुळे कोणालाच काहीएक सुचायला, विचार करायला वेळच नव्हता. मात्र त्यावेळी “देव तारी त्याला कोण मारी?”या म्हणीचा आम्हांला प्रत्यय तर आलाच पण गाडी चालवतांना काही एक टेन्शन न घेता फक्त रहदारीच्या नियमानुसारच गाडी चालवायला हवी. नाहीतर …..                                 आता ती वेळ आली नव्हती म्हणून हा कधीही विसरू शकणार नाही असा नियम पालनाचा महत्वाचा धडा तर आम्हांला मिळाला. आणि आपल्याबरोबर हा प्रसंग शेअर करण्याची संधीही…

~ ज्योती कपिले

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s